रवींद्र जुनारकर, कुरखेडा (गडचिरोली)

दादापूर येथे मंगळवारी रात्री नक्षलींनी केलेली ३६ वाहनांची जाळपोळ हा जवानांना अडकवण्याचा सापळाच होता, असे आता उघड झाले आहे.

या वाहनांच्या जाळपोळीनंतर पंचनामा करायला पोलीस येतील याची पूर्ण खात्री नक्षलींना होती. तसेच घडले. शीघ्र कृती दलाचे (क्यूआरटी)१५ पोलिस शिपाई एका खासगी वाहनाने पंचनाम्यासाठी घटनास्थळाकडे निघाले. त्यांच्या प्रत्येक घडमोडीची माहिती नक्षलींना पुरवणारा एक हेर पोलिसांच्या वाहनापुढे दुचाकीवर चालत होता. हे वाहन जांभुळखेडा-लेंढारी नाल्याच्या छोटय़ा पुलावर येताच नक्षलींच्या हेराने इशारा केला आणि लांब लपून बसलेल्या नक्षलींनी ३० किलो स्फोटकांचा भुसूरूंग स्फोट घडवून आणला. नक्षलवाद्यांच्या नियोजनबद्ध सापळय़ात पोलीस असे अलगद अडकले.

गडचिरोली जिल्हा उत्तर व दक्षिण असा विभागला असून दक्षिण गडचिरोलीच्या भामरागड, एटापल्ली, धानोरा, सिरोंचा, अहेरी या भागांत नक्षलवादी सक्रिय आहेत. उत्तर गडचिरोलीचा कुरखेडा, आरमोरी, कोरची हा भाग तसा शांत. त्यामुळे पोलिसांचे उत्तरेकडे असलेले दुर्लक्ष पाहून नक्षलवाद्यांनी ही संधी साधली. छत्तीसगडच्या अमर कन्स्ट्रक्शन कंपनीकडून पुराडा-मालेवाडा-येरकड या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. कामावरील ५०० कामगार, सर्व वाहने आणि यंत्रसामग्री दादापूरला होती.  ३० एप्रिलच्या रात्री २०० सशस्त्र नक्षलवादी आले. यामध्ये ७५ टक्के महिला नक्षलवादी होत्या. त्यांनी गावाला चारही बाजूंनी घेरले आणि येथील वाहनांना आग लावली. ही जाळपोळ पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू होती. त्यानंतर काही नक्षलवादी जांभुळखेडा-लेंढारी नाल्याजवळ आले. पुलाच्या तोंडावर नक्षलवाद्यांनी ३० किलो स्फोटके पेरून ठेवली. जाळपोळीची घटना कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांना कळल्यावर ते तीन ते चार पोलिसांसह १२ किलोमीटर अंतरावरील पुराडा ठाण्याकडे आले आणि इथून त्यांनी कुरखेडा पोलीस ठाण्यात दूरध्वनी करून शीघ्र कृती दलाची कुमक मागवून घेतली. हे दल तिकडे निघताच त्यांच्या पाठोपाठ दुचाकीवर नक्षलवाद्यांचा साथीदारही निघाला. पोलिसांचे वाहन पुलावर येताच दुचाकीवरील नक्षल्याने इशारा केला आणि स्फोट घडवला गेला. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे सायंकाळी ७ वाजता तेथे पोहचले.

खोब्रामेंढा-टिपागड-कोरची-कुरखेडा दलमचे कृत्य

हा शक्तीशाली भूसुरूंगस्फोट उत्तर गडचिरोलीत सक्रिय असलेल्या नक्षलवाद्यांच्या खोब्रामेंढा, टिपागड, कोरची आणि कुरखेडा या चार दलमने एकत्रितपणे केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मागील काही दिवसांपासून या दलमने या भागात पाहणी सुरू केली होती. या दलममध्ये तरुण-तरुणींचा सहभाग अधिक आहे.

‘राजकीय नेतेच  दारूगोळा पुरवतात’

गोंदिया : राजकीय नेतेमंडळीच नक्षलवाद्यांना दारूगोळा व शस्त्रे पुरवतात. या नेतेमंडळींचे नक्षलवाद्यांसोबत साटेलोटे असतात, असा आरोप या नक्षल हल्ल्यात शहीद झालेल्या लाखांदूर येथील दयानंद शहारे यांची आई शकुंतला  शहारे यांनी केला.  मृलाच्या अशा अकाली मृत्यूने व्यथित  शकुंतला शहारे म्हणाल्या, नक्षलवाद्यांनी कधी नेत्यांना काही केले असे ऐकिवात नाही. मात्र पोलिसांचे हत्यासत्र सुरूच आहे. आज ‘सर्जिकल स्टाईक’ची गरज सीमेवर नव्हे तर नक्षलवाद्यांचा नायनाट करण्याकरिता जंगलात असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.