लोकसभा निवडणुकीत भाजपचे गोपीनाथ मुंडे यांनी १ लाख ३६ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला. दुसऱ्या क्रमांकांची मते राष्ट्रवादीचे सुरेश धस यांना मिळाली. इतर ३७ उमेदवारांना अनामत रक्कमही वाचवता आली नाही. पण या सर्व उमेदवारांनी मिळून जवळपास ९५ हजार मते घेतली. यात आठ उमेदवार मुस्लिम समाजाचे, भारिप, बसपा व इतर उमेदवारांचा राष्ट्रवादीलाच फटका बसला. तर दोन हजार लोकांनी नकाराधिकारही बजावला हे विशेष.
 बीड लोकसभा मतदारसंघाची लढत राज्यात लक्षवेधी होती. त्यामुळे प्रमुख दोन्ही उमेदवारांनी मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी अनेक डाव टाकले. त्यातून निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांची संख्या वाढली आणि तब्बल ३९ उमेदवार निवडणूक िरगणात राहिले. १२ लाख ३७ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात भाजपचे गोपीनाथ मुंडे यांनी ६ लाख ३५ हजार ९९५ तर राष्ट्रवादीचे सुरेश धस यांनी ४ लाख ९९ हजार ५४१ मते घेतली. या दोन उमेदवारांव्यतिरिक्त इतर ३७ उमेदवारांनी तीन अंकी आकडाही पार न केल्यामुळे या सर्व उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झाली आहे. यात बहुजन समाज पक्षाचे दिगंबर राठोड यांनी १४ हजार १६२ तर माजलगाव विधानसभा मतदारसंघातील प्रकाश सोळंके या अपक्ष उमेदवाराने ८ हजार ५९५ व इतर उमेदवारांनी मिळून ९५ हजार मते घेतली. यात मुस्लीम समाजाच्या आठ उमेदवारांनीही मोठय़ा प्रमाणात मते खेचली. या इतर उमेदवारांच्या मताचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला बसल्याचे मानले जात आहे.