21 September 2020

News Flash

पंढरपुरात ३८ लाखांचा गुटखा जप्त

अवैध रीत्या गुटखा विक्री करणाऱ्यावर कारवाईचा रविवारी बडगा उगारला.

पंढरपूर येथे अन्न व औषध विभागाच्या वतीने अवैध रीत्या गुटखा विक्री करणाऱ्यावर कारवाईचा रविवारी बडगा उगारला. अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाच्या वतीने सदरची कारवाई करण्यात आली. या कारवाईमधे सुमारे ३८ लाखांचा गुटखा आणि १० लाखांचा वैधानिक इशारा नसलेल्या सिगारेटचा साठा जप्त केल्याची माहिती अन्न व औषध पुणे विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी दिली आहे.

सदरची कारवाई करीत असताना अन्न व औषध प्रशासन विभागाचे पुणे विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई तसेच सोलापूर येथील सहायक आयुक्त संजय नारगौडा, नीलेश मसारे, श्रीमती मुजावर, पुणे, सातारा,कोल्हापूर व सांगली येथील अशा २८ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमधे सहायक पोलीस अधीक्षक निखिल िपगळे यांनी देखील सहभाग घेतला होता.

रविवारी सकाळी सुमारे अकराच्या सुमारास अन्न व औषध प्रशासनाने शहरातील काही पानटपरी येथे बंदी असताना देखील गुटखा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. यामध्ये काही प्रमाणात अनेक पानटपऱ्यांमधून गुटख्याचा माल हस्तगत करण्यात आला होता. याच वेळी कारवाई करणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना येथील मार्केट यार्ड शेजारील असणाऱ्या अकबरअली नगर येथे रज्जाक तांबोळी यांच्या घरांमधे मोठय़ा प्रमाणावर गुटखा तसेच तंबाखू आदीच्या मालाचा साठा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार संपूर्ण अन्न व औषध प्रशासनातील पथक हे अकबरअली येथील तांबोळी यांच्या घरांकडे रवाना झाली. या वेळी सहा पोलीस अधीक्षक निखिल िपगळे देखील तत्काळ त्या ठिकाणी पोहोचले.

अकबरअली नगर येथील ऑस्मा मंझिल या एका आलिशान बंगल्यामध्ये सदरचे पथक जाऊन पोहोचले. या वेळी संपूर्ण दोन मजली बंगल्यामधे फक्त आणि फक्त आरएमडी, बाबा, सुगंधी तंबाखू तसेच माव्याचे सामान अशा पोत्यात आणि बॉक्समधे भरून ठेवलेल्या गोष्टींचा मोठय़ा प्रमाणावरील साठा आढळून आला. या वेळी सहा पोलीस अधीक्षक निखिल िपगळे याच्यासह सहआयुक्त देसाई तसेच नारगौडा यांनी याबाबत तांबोळी यांच्याकडे चौकशी केली तसेच संपूर्ण गुटख्याचा माल हा आपल्या ताब्यात घेतला.

रविवारच्या दिवसभराच्या कारवाईमधे शहरामधील विविध ४६ ठिकाणी तपासणी करण्यात आली. यामधे अकरा ठिकाणी सुमारे ३४ लाख ३२ हजार ५२५ रुपयांचा गुटखा आढळून आला. तर या तपासणीदरम्यान आरोग्याचा वैधानिक इशारा नसलेला साधारणत: ९ लाख ७५ हजार ३५८ रुपयांचा सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला .

पंढरीतील एका आलिशान बंगल्यामध्ये गुटख्याचा इतक्या मोठय़ा प्रमाणावर साठा असलेल्या मालावर छापा टाकून कारवाई झाल्याचे वृत्त सर्वत्र पंढरीत कळताच तत्काळ पंढरपुरातील अनेक पानटपऱ्या या दिवसभरासाठी चक्क बंद करून टाकण्यात आल्या होत्या.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2016 1:36 am

Web Title: 38 lakh rs gutkha seized in pandharpur
Next Stories
1 मंत्रिपदासाठी दसऱ्यापर्यंत वाट पाहू -विनायक मेटे
2 किल्ले रायगडावर शाक्त शिवराज्याभिषेक सोहळा
3 यवतमाळमधील मराठा मोर्चा ऐतिहासिक
Just Now!
X