सोलापूर जिल्ह्य़ात विधानसभा निवडणुकीसाठी ११ जागांकरिता तब्बल ३८२ अशा विक्रमी स्वरूपात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यात सर्वाधिक ५७ उमेदवार सोलापूर दक्षिणमध्ये तर सर्वात कमी १८ उमेदवार बार्शीत आहेत.
वाढत्या उमेदवारी अर्जामुळे राजकीय वातावरण तापले असून उद्या सोमवारी अर्जाची छाननी होणार आहे. तर प्रमुख राजकीय पक्षांमध्ये बहुरंगी लढती होत असताना प्रमुख पक्षांमध्ये बंडखोरीची लागण झाली असून ती शमविण्यासाठी त्या पक्षांचे श्रेष्ठी व वजनदार नेते मंडळी आतापासूनच प्रयत्नांना लागली आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीसह भाजप, शिवसेना आदी प्रमुख पक्षांत बंडखोरांचा उन्माद दिसून येतो.
काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी राजकीय प्रतिष्ठेच्या ठरलेल्या सोलापूर शहर मध्यमध्ये त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात माकपचे नरसय्या आडम मास्तर व सेनेचे महेश कोठे यांच्यासह प्रा.मोहिनी पत्की (भाजप), विद्या लोळगे (राष्ट्रवादी), तौफिक शेख (एआयएमआयएम) आदी प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. यात सेनेचे माजी आमदार शिवशरण पाटील, सुनील कामाठी, विष्णू कारमपुरी आदींनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले आहेत. तर सोलापूर शहर उत्तरमध्ये भाजपचे आमदार विजय देशमुख यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी आमदार विश्वनाथ चाकोते, राष्ट्रवादीचे महेश गादेकर, शिवसेनेचे माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे आदींसह ३५ उमेदवार तयार आहेत. भाजपचे आमदार देशमुख यांच्या विरोधात पक्षांतील सुरेश पाटील, प्रा. मोहिनी पत्की, नागेश वल्याळ, रोहिणी तडवळकर आदी नगरसेवकांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. ही बंडखोरी भाजपला डोकेदुखीची ठरली आहे. तर राष्ट्रवादीने अगोदर माजी महापौर मनोहर सपाटे यांना उमेदवारी दिली होती. परंतु नंतर त्यात बदल होऊन महेश गादेकर यांना संधी मिळाली. शहर मध्यचे सेनेचे उमेदवार महेश कोठे यांनी शहर उत्तरमध्येही अर्ज भरला आहे.
सोलापूर दक्षिणमध्ये सर्वाधिक ५८ उमेदवार असून यात काँग्रेसचे आमदार दिलीप माने, भाजपचे माजी खासदार सुभाष देशमुख, सेनेचे गणेश वानकर, राष्ट्रवादीचे बाळासाहेब शेळके, अपक्ष माजी आमदार रवी पाटील, मनसेचे युवराज चुंबळकर, गवई गट रिपाइंचे सुबोध वाघमोडे, एमआयएमचे अर्जुन सलगर आदींचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बसवराज बगले यांनी बंडखोरी केली आहे.
अक्कलकोटमध्ये भाजपचे आमदार सिद्रामप्पा पाटील व काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह राष्ट्रवादीचे मल्लिकार्जुन पाटील, दिलीप सिद्धे, मनसेचे फारूख शाब्दी, शिवसेनेचे मनोज पवार यांच्यासह २८ उमेदवार आहेत, तर मोहोळ राखीव जागेवर राष्ट्रवादीचे आमदार प्रा. लक्ष्मण ढोबळे यांचा पत्ता कापला व रमेश कदम यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रा. ढोबळे यांनी नाराज होऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो असफल ठरल्यामुळे शेवटी त्यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. वैभव गौतम खरात (काँग्रेस), संजय क्षीरसागर (भाजप), मनोज शेजवाल (शिवसेना), दीपक गवळी (मनसे) आदी मिळून ४० उमेदवार आहेत.
बार्शी येथे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांच्या विरोधात शिवसेनेचे माजी आमदार राजेंद्र राऊत व काँग्रेसचे सुधीर गाढवे यांच्यासह भाजपचे राजेंद्र मिरगणे, गणेश शिंदे (बसपा) आदी एकूण १८ उमेदवार आहेत. तर पंढरपुरात काँग्रेसचे आमदार भारत भालके व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत परिचारक यांच्या लक्षवेधी लढतीत समाधान अवताडे (शिवसेना), चंद्रकांत बागल (राष्ट्रवादी), जयवंत माने (मनसे) यांच्यासह एकूण ४५ उमेदवार आहेत. माढा येथे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात लढविण्यासाठी शिवसेनेत गेलेले साखर सम्राट कल्याणराव काळे हे सेनेत संधी मिळत नसल्याचे पाहून त्यांनी पुन्हा काँग्रेसची वाट धरली. काँग्रेसनेही त्यांना उमेदवारी बहाल केली. या ठिकाणी २४ उमेदवार आहेत.
सांगोल्यात शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. शिवसेनेतर्फे माजी आमदार शहाजीबापू पाटील, काँग्रेसचे जगदीश बाबर, श्रीकांत देशमुख, अ‍ॅड. मच्छिंद्र पाटील (अपक्ष) आदी मिळून उमेदवारांची संख्या २४ इतकी आहे. माळशिरस राखीवमध्ये राष्ट्रवादीचे आमदार हणमंत डोळस व स्वाभिमानीचे उत्तम जानकर, अण्णा पाटील, भीमराव सावंत, काँग्रेसचे प्रकाश धाइंजे, बसपाचे भारत गायकवाड यांच्यासह ४२ उमेदवार आहेत. करमाळ्यात राष्ट्रवादीच्या रश्मी बागल व काँग्रेसचे जयवंत जगताप, शिवसेनेचे नारायण पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संजय शिंदे, शेकापचे महेश चिवटे, मनसेचे जािलदर जाधव आदी १९ उमेदवार आहेत. या ठिकाणी संजय शिंदे या एकाच नावाचे चार उमेदवार आहेत.