लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : जिल्ह्यात ३९ नव्या करोनाबाधित रुग्णांची सोमवारी भर पडली. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १७४२ झाली आहे. दरम्यान, आज २८ रुग्णांनी करोनावर मात केल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली.

अकोला जिल्ह्यात करोनाच्या प्रकोप सुरूच आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रुग्ण संख्येसोबतच करोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही वेगाने वाढले. सुदैवाने आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मात्र, रुग्ण मोठ्या संख्येने वाढण्याचे सत्र कायम आहे. जिल्ह्यातील एकूण ३७४ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी ३३५ अहवाल नकारात्मक, तर ३९ अहवाल सकारात्मक आले आहेत. सध्या ३६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ८९ रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात एका आत्महत्येचा समावेश आहे. दरम्यान, सर्वोपचार रुग्णालयातून आज दुपारनंतर १० जणांना, तर कोविड केअर केंद्रातून १८ अशा एकूण २८ रुग्णांना सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत १२८६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

आज दिवसभरात ३९ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. सकाळच्या अहवालात ३३ नवे रुग्ण आढळून आले. त्यात १७ महिला तर १६ पुरुष रुग्ण आहेत. त्यामध्ये बाळापूर येथील ११, बोरगाव मंजू येथील पाच, कारागृह वसतिगृह येथील तीन, पोळा चौक, सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी दोन तर ज्ञानेश्वार नगर, मोठी उमरी, वानखडे नगर, कैलास नगर, आदर्श कॉलनी, वाशीम बायपास, महान, अकोट, खामगाव व वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे. सायंकाळच्या अहवालात सहा जणांचे अहवाल सकारात्मक आले. त्यात १३ महिन्यांच्या बालिकेसह तीन महिला, एक चार वर्षे व एक आठ वर्षीय बालकांसह तीन पुरुष आहेत. या रुग्णांपैकी चार जण गिता नगर येथील तर अन्य नानक नगर व कच्ची खोली येथील रहिवासी आहेत.

साडेबारा हजारावर नमुन्यांचे अहवाल
जिल्ह्यात आजपर्यंत एकूण १२७०६ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १२२९९, फेरतपासणीचे १५२ तर वैद्याकीय कर्मचाºयांचे २५५ नमुने होते. आजपर्यंत एकूण १२६१२ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण नकारात्मक अहवालांची संख्या १०८७० आहे, तर सकारात्मक अहवाल १७४२ आहेत.