सोलापूर : करोना विषाणू प्रादुर्भावाची दुसरी लाट वेगाने उसळत असून त्यात दररोज प्रचंड संख्येने नवीन रुग्णांची भर पडत आहे. तर दुसरम्य़ा बाजूला मृतांची संख्या वाढत आहे. यातच कोविड रुग्णालये रुग्णांनी भरली असून नवीन रुग्णांना खाटा मिळणे दुर्लभ होत असतानाच त्यात प्राणवायूसह व्हेंटिलेटर आणि रेमडेसिविर इंजेक्शन्स मिळणेही दुरापास्त ठरत आहे.

शहरात करोना रुग्णांसाठी ४० रुग्णालये असून त्यात सुमारे दोन हजार खाटांची उपलब्धता आहे. मात्र यात प्राणवायू आणि व्हेंटिलेटरसह खाटांची मोठय़ा प्रमाणात कमतरता जाणवत आहे. गंभीर व अतिगंभीर रुग्णांना प्राणवायू आणि व्हेंटिलेटरची सुविधा मिळणे अत्यावश्यक ठरते. परंतु सोलापुरात त्याचा मोठय़ा प्रमाणात अभाव दिसत आहे. यातच रेमडेसिवर इंजेक्शन्सची टंचाई वाढतच असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची हतबलता स्पष्टपणे दिसून येत आहे. दररोज शहरात दोन हजार ‘रेमडेसिविर’ची गरज असताना गेल्या आठवडय़ापासून त्याची पुरेशी उपलब्धता होत नाही. जेमतेम पाचशे ते सहाशेपर्यंतच रेमडेसिविर मिळत असताना सोमवारी तर केवळ ३९० इतकेच रेमडेसिविर इंजेक्शन्स प्रशासनाला उपलब्ध करता आले. यात शहरात उपचार घेणारम्य़ा रुग्णांसाठी मिळालेल्या १०८ रेमडेसिविर इंजेक्शन्सचा समावेश आहे.