कोल्हापूर जिल्ह्य़ात सलग तिस-या दिवशी पावसाने हजेरी लावली. शहरात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या असल्या तरी काही भागात वादळी वा-यासह विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. वीज कोसळल्याने कळंकवाडी (ता.राधानगरी) येथे शेतात काम करणा-या सुशीला बंडोपंत पाटील (वय ४८)या महिलेचा मृत्यू झाला.    
गेली दोन दिवस जिल्ह्य़ात पावसाने हजेरी लावली होती. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. पण आज सकाळपासून पुन्हा उकाडा सुरू झाला होता. वातावरणातील उष्मा पाहूनच सायंकाळी पावसाचे आगमन होणार याचा अंदाज वर्तविला जात होता. दुपारनंतर वातावरण ढगाळ झाले. सायंकाळी शहरात पावसाने हजेरी लावली. तथापी, कालच्या पावसाच्या तुलनेत आजच्या सरी मात्र अल्प प्रमाणात होत्या.     इचलकरंजी व परिसरात आज जोरदार पाऊस झाला. गेली दोन दिवस तेथे नुकताच शिडकाव होत होता. उकाडय़ाने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे थंडाव्याची अनुभूती मिळाली. रात्री उशीरापर्यंत पाऊस पडत असल्याचे वृत्त होते.