काळा पैसा खणून काढण्यासाठी मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. मोदींनी केलेल्या लक्ष्यभेदी कारवाईनंतर काळा पैसा आता बाहेर येऊ लागला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील भंगार व्यापाऱ्याजवळून ४ कोटींची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. ही रोकड मध्यप्रदेशातील बुरहानपूर येथे घेऊन जात असल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

महाराष्ट्र – मध्यप्रदेशच्या सीमेवर तपासणी पथकाला भंगार व्यापारी शब्बीर हुसैन याच्या कारमध्ये ४ कोटींची रोकड सापडली आहे. आरोपीला बुरहानपूर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शब्बीर हुसैन बुरहानपूरमधील एका व्यापाऱ्याला ही चार कोटींची रोकड देणार होता. चौकशीनंतरच ही रोकड घेऊन जाण्यामागचा हेतू समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.

अंतरोली फाट्यावर एक कार मलकापूरहून येत होती. त्यात शब्बीर हुसैन आपल्या कुटुंबीयांसोबत बसला होता. संशयावरून त्याची चौकशी करण्यात आली. त्यावेळी आपल्याकडील बॅगमध्ये ५० लाख रुपये आहेत, असे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही माहिती दिली, असे पोलीस अधीक्षक संजीव बाविस्कर यांनी सांगितले. तीन बॅगांमध्ये हजार-हजाराच्या नोटा असलेली एकूण ४ कोटींची रोकड होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात शब्बीरविरोधात तक्रार दाखल करण्यात आली
आहे. त्याची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी हस्तगत केलेली रोकड आयकर विभागाकडे सोपवली असून, याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.