गुरुपौर्णिमा उत्सव काळात शिर्डीत साईभक्तांनी कोट्यवधींचं दान केलं आहे. यामध्ये रोखरक्कम, बँक चेक, ड्राफ्ट तसेच सोने चांदीचा समावेश आहे. यंदा १ लाख ८६ हजार ७८३ भक्‍तांनी गुरुपौर्णिमेला साई दर्शनाचा तर २ लाख ५४१ प्रसाद भोजनाचा लाभ घेतला आहे.

साईभक्तांनी साईबाबांच्या चरणी तब्बल चार कोटी रूपयांचे दान जमा केले आहे. यामध्ये १७ देशांच्या परकीय चलनाचा सह समावेश आहे. गुरुपौर्णिमा उत्सव काळात शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. जगभरातून आलेले भाविक शिर्डीत साईचरणी गुरुदक्षिणा देत असतात. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यावेळी दोन कोटीं कमी दान जमा झालं आहे. गेल्यावर्षी साईबाबां चरणी तब्बल सहा कोटी रूपयांचे दान जमा केले होते.

यंदा साईच्या दरबारात गुरुपोर्णिमा उत्सव १५ ते १७ जुलै या कालावधी साजरा झाला. या तीन दिवसात साई मंदिर आणि परिसरातील दान पेट्या पैशाने भरल्या गेल्या. त्याची मोजणी गुरुवारी करण्यात आली. तीन दिवसांत साई चरणी चार कोटींचे दान मिळाल्याचे संस्थानांचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले.