लोकसत्ता प्रतिनिधी

अकोला  जिल्ह्यात करोनामुळे आणखी चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १८ नवीन करोनाबाधित रुग्ण बुधवारी आढळून आले आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ३३३१ झाली. आतापर्यंत जिल्ह्यात १४१ करोनाबाधितांचे मृत्यू झाले आहेत. अकोला जिल्ह्यात पुन्हा एकदा करोनाबाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरू झाले. सोबतच दररोज मोठ्या संख्येने रुग्णवाढही होत आहे. जिल्ह्यातील एकूण १३७ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी ११९ अहवाल नकारात्मक, तर १८ अहवाल सकारात्मक आले. सध्या ३७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज तब्बल चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. गुलजारपुरा येथील ३५ वर्षीय स्त्री रुग्णाला १६ ऑगस्ट, कोठारी पैलपाडा येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाला १० ऑगस्ट, तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील ८२ वर्षीय पुरुष रुग्णाला १७ ऑगस्ट, तेल्हारा तालुक्यातीलच रायखेड येथील ७० वर्षीय पुरुष रुग्णाला १६ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या सर्वांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आज करोनाबाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मूर्तिजापूर येथील सहा जण, बार्शिटाकळी दोन, तर गोरक्षण रोड, गायत्री नगर, भीम नगर, डाबकी रोड, अकोट, पिंजर, राजणखेड, हातगाव, बेलखेड येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, आज दुपारनंतर शासकीय वैद्याकीय महाविद्याालयातून १७, कोविड केअर केंद्रातून तीन, मूर्तिजापूर पाच, हेंडज मूर्तिजापूर येथून २२, अकोट आठ, खासगी हॉटेल व रुग्णालयांमधून तीन असे एकूण ५८ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यातील २८१७ जण करोनामुक्त झाले आहेत.