नगर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दिलीप गांधी यांनी आता माफीनामासत्र सुरू केले आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आपण सन्मान राखू असे सांगत त्यांनी मतदारसंघातील युतीच्या चार आमदार हीच आपली शिदोरी आहे हे स्पष्ट केले.
महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आज नगरला आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात गांधी बोलत होते. नगर शहरातील आमदार अनिल राठोड व शिवसेनेच्या पदाधिका-यांनी अपेक्षेप्रमाणे या मेळाव्याकडे पाठच फिरवली. भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार राम शिंदे, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार विजय औटी, शिवसेनेचे संपर्कप्रमुख सुहास सामंत, जिल्हाप्रमुख (दक्षिण) शशिकांत गाडे, भारिपचे श्रीकांत भालेराव, मोहन पालवे, भाजपचे शहराध्यक्ष अभय आगरकर, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख गीता गिल्डा आदी या वेळी उपस्थित होते.
गांधी म्हणाले, मागच्या पाच वर्षांच्या काळात केंद्राच्या माध्यमातून जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणावर निधी आणला. अनेक योजनांचा तर देशात सर्वाधिक लाभ नगर मतदारसंघाने उठवला. त्यात आपल्याला चांगले यश आले. मात्र तरीही काही कामे अपूर्ण राहिली, तेथे युतीच्या चार आमदारांची मोठी मदत आपल्याला झाली. अशा ठिकाणी त्यांचा निधी प्राप्त झाला. नगर अर्बन बँकेबाबत विरोधकांकडून खोटानाटा प्रचार सुरू असल्याचा आरोप गांधी यांनी केला. बँकेत कोणताही गैरव्यवहार नाही, उलट आपल्या काळात बँकेची प्रगतीच झाली असा दावा गांधी यांनी केला.
आमदार शिंदे, आमदार औटी, आमदार कर्डिले यांच्यासह अन्य वक्त्यांची या वेळी भाषणे झाली.
राठोडही येतील
मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना सामंत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. काहीही असले तरी आमदार राठोड लवकरच गांधी यांच्या प्रचारात सहभागी होतील असा दावा त्यांनी केला. आजही पक्षाच्या बैठकीसाठी ते मुंबईला गेल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावरही त्यांनी टीका केली. राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, सुनील तटकरे यांची नावे भ्रष्टाचारात अडकली असताना त्यांच्याबाबत ते काहीही बोलत नाहीत असे ते म्हणाले.