शिवसेनेचे आतापर्यंत चार खासदार फुटले. यातील केवळ भाऊसाहेब वाकचौरे यांनाच मारहाण का? एखाद्या दलित खासदाराने बंडखोरी केली तर त्याला मारायचे, ही महाराष्ट्राची सामाजिक पाश्र्वभूमी लक्षात घेता उचित आहे का? असा प्रश्न उपस्थित करुन राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेवर टीका केली.
राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांच्या प्रचारार्थ आव्हाड येथे आले होते. उद्या (शनिवारी) मंठा, जिंतूर, गंगाखेड येथे त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. पत्रकारांशी बोलताना आव्हाड यांनी शिवसेना-भाजप हे पक्ष जातीयवादी असल्याचा आरोप करुन त्यांची मनुवादी मानसिकता सातत्याने दिसून येते, असा टोला लगावला. नवनीतकौर राणा यांच्याबद्दल जी टीका होत आहे, तीसुद्धा मनुवादी मानसिकतेचे लक्षण आहे. एखादी दलित युवती सुंदर असू शकत नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राजकारणात जयललिता, हेमामालिनी, रेखा, जयाप्रदा या अभिनेत्री आल्या. पण नवनीत कौर यांच्यावर जी टीका होते, ती जातीय मानसिकतेतून होत असल्याचे ते म्हणाले.
सहा महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदी यांची हवा होती, ती आज नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना स्विर्झलडमधील बर्फ पाहायला वेळ मिळतो; पण महाराष्ट्रातल्या गारपीटग्रस्तांना भेट देण्यास वेळ मिळत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. सध्या ‘पाच पांडव’ हे कौरवांसारखे भांडत आहेत. दुसरीकडे गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या ओबीसी नेत्याला नितीन गडकरी यांनी घरात बसवले आहे. भाजप हा पक्ष मुंडेंचा की गडकरींचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे, असेही आव्हाड म्हणाले. विजय भांबळे, प्रताप पाटील चिखलीकर, माजी खासदार सुरेश जाधव, संतोष बोबडे आदी उपस्थित होते.