प्रबोध देशपांडे 
अकोला  शहरात करोनामुळे तब्बल चौघांचा मृत्यू झाल्याचे आज (बुधवार) समोर आले आहे. या चारपैकी दोन महिला रुग्णांचा कालच मृत्यू झाला होता. आज त्यांचे अहवाल सकारात्मक आले. एका रुग्णाचा मृत्यू रुग्णालयात उपचारादरम्यान, तर आणखी एका रुग्णाला मृत अवस्थेत रुग्णालयात आणले होते. त्याचा अहवालही सकारात्मक आला. त्यामुळे आज करोनामुळे एकूण चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली. करोनाबाधित रुग्ण वाढीचे सत्र कायम असून आज एकूण सात जणांचे अहवाल सकारात्मक आले. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता ८२ झाली तर एकूण ११ जणांचा मृत्यू झाला. सध्या ५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अकोला जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. सोमवारी एकूण १०० तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ९३ अहवाल नकारात्मक तर सात जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ८२ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यातील तब्बल ११ जणांचा मृत्यू झाला. मृत्यूपैकी एकाने आत्महत्या केली आहे. आतापर्यंत १४ जणांनी करोनावर मात केली. सद्यास्थितीत ५७ करोनाबाधित रुग्णालयात उपचार घेत आहेत.

दरम्यान आज एकूण चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली. एका ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा बुधवारी सकाळी उपचारादरम्यान सर्वोपचार रुग्णालयात मृत्यू झाला. हा रुग्ण २ मे रोजी रुग्णालयात दाखल झाला होता. काल ५ मे रोजी प्राप्त अहवालात त्या रुग्णाचा करोना तपासणी अहवाल सकारात्मक आला होता. मृतक शहरातील खंगनपूरा भागातील रहिवासी होता. ५ मे रोजी दोन महिलांचा मृत्यू झाला होता. त्यांचा करोना तपासणी अहवाल आज सकारात्मक आला. त्या बैदपुरा भागातील रहिवासी होत्या. दाणाबाजार येथील एकाला मृत अवस्थेत रुग्णालयात आणले. त्या व्यक्तीचा अहवालही आज सकारात्मक आला.

आज एकूण सात सकारात्मक अहवाल आले. कालचा एक सकारात्मक व आजचे तीन सकारात्मक असे चार मृत्यू झाले. आजच्या उर्वरित चार सकारात्मक आलेल्यांमध्ये दोन महिला, सहा वर्षीय बालिका व २० वर्षीय युवतीचा समावेश आहे. महिला रुग्ण एक ताजनगर व अन्य एक राधाकिसन प्लॉट येथील रहिवासी आहे, तर बालिका व युवती डाबकी रोड भागातील रहिवासी आहेत. करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. प्रतिबंधित क्षेत्रात घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, एका तीन वर्षीय बालकाने करोनावर मात केल्याने त्याला सायंकाळी रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

बाजारपेठेत गर्दी उसळली
दोन दिवसांच्या संपूर्ण टाळेबंदीनंतर आज शहरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने निर्धारित वेळेमध्ये उघडली होती. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. अगोदरच शहरात रुग्णांची संख्या वाढत असतांना बाजारपेठेत सामाजिक अंतराचा फज्जा उडाला. त्यामुळे समूह संक्रमणाचा धोका अधिक वाढला आहे.