एसटी बसमधून निघालेल्या दोन प्रवाशांकडून ४० लाख रुपयांची रोकड सोमवारी दुपारी पोलीसांनी पकडली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील एका नेत्यासाठी ही रोकड घेऊन जाण्यात येत होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. अशा प्रकारे एसटी बसमधून रोकड जप्त करण्याची विधानसभा निवडणुकीच्या प्रचारकाळातील ही पहिलीच घटना आहे.
मुंबई सेंट्रल स्थानकावरून ही बस कोल्हापूरच्या दिशेने निघाली होती. बसमधून प्रवास करणाऱय़ा दोघांकडे एक सुटकेस आणि एक लेदर बॅग होती. पोलीसांनी ती तपासल्यावर त्यामध्ये रोकड असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलीसांनी तातडीने त्या दोघांना ताब्यात घेतले. पकडलेले दोघेही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.