लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : जिल्ह्यात ४० नवे करोनाबाधित रुग्ण बुधवारी आढळून आले आहेत. काल रॅपिड टेस्टमध्ये सकारात्मक आढळून आलेल्या २२ रुग्णांचीही आज नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या २२४६ वर पोहोचली आहे. १९ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली.

जिल्ह्यात करोना संसर्ग पुन्हा एकदा वेगाने पसरत आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्ण मोठ्या संख्येने बाधित असल्याचे आढळून येत आहेत. सुदैवाने गेल्या दोन दिवसांपासून मृत्यूची नोंद झाली नाही. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण २५७ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी २१७ अहवाल नकारात्मक, तर ४० अहवाल सकारात्मक आले आहेत. काल रात्री रॅपिड टेस्टमध्ये २२ अहवाल सकारात्मक आले. त्याचाही समावेश एकूण रुग्ण संख्येत आज करण्यात आला आहे. सध्या ३४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज दिवसभरात ४० जणांचे अहवाल सकारात्मक आले. सकाळीच्या अहवालातच ते आढळून आले असून त्यात २४ महिला व १६ पुरुष आहेत. त्यामध्ये पातूर येथील १६ जण, हिवरखेड येथील तीन जण, बोरगांव मंजू, सातव चौक, खदान, अकोली जहाँगीर, वाडेगाव, आलेगांव येथील प्रत्येकी दोन, मोठी उमरी, लोकमान्य नगर, अकोट, सिंधी कॅम्प, जीएमसी वसतिगृह, खडकी, विजय नगर, न्यू भीम नगर व रामदास पेठ येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी प्राप्त ६४ अहवालांत एकही सकारात्मक रुग्ण आढळला नाही. आज दुपारनंतर शासकीय वैद्याकीय महाविद्याालय येथून तीन, कोविड केअर केंद्रातून एक, मूर्तिजापूर येथून सात, खासगी रुग्णालय व हॉटेल मिळून आठ असे एकूण १९ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यातील १७९८ जण करोनामुक्त झाले आहेत.