01 March 2021

News Flash

तारापूरमधील वस्त्रोद्योगांतील उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत घट

वस्त्रोद्योग आणि त्यावर अवलंबून असलेल्या रसायने व इतर उद्योग मंदीच्या फेऱ्यात सापडले आहेत.

नीरज राऊत, पालघर

तारापूर औद्योगिक क्षेत्रासह पालघर, वाडा, वसई तालुक्यातील हजारो उद्योग मंदीच्या छायेत आहेत. तेथील वस्त्रोद्योग क्षेत्रातील उत्पादनात जवळपास ४० टक्क्यांपर्यंत घट करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांत सहा उद्योगांनी आपली यंत्रसामुग्री चक्क भंगारात विकली आहे.

सुमारे १८०० उद्योग असणाऱ्या तारापूर औद्योगिक वसाहतीसह पालघर जिल्ह्यात लघुउद्योगांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यात रसायन उत्पादन, औषधनिर्मिती, वाहन क्षेत्राशी संबंधित उद्योगांबरोरबच वस्त्रोद्योग आणि पोलाद उद्योगही आहेत. मागणीतील घट आणि सरकारी धोरणांमुळे लघुउद्योगांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. तसेच मोठे उद्योग संघटित क्षेत्रातील उद्योगांकडून खरेदीस प्राधान्य देत असल्याने असंघटित क्षेत्रातील व्यवसाय आणि सेवा क्षेत्रातील उद्योग संकटात सापडले आहेत. वाहन उद्योगातील मंदीचा फटका वाहनांचे सुटे भाग बनविणाऱ्या उद्योगांना बसला आहे.

वस्त्रोद्योग आणि त्यावर अवलंबून असलेल्या रसायने व इतर उद्योग मंदीच्या फेऱ्यात सापडले आहेत. तारापूरमध्ये या क्षेत्रातील सुमारे सव्वाशे मोठय़ा व मध्यम उद्योगांच्या उत्पादनात ३० ते ४० टक्के घट झाली आहे. वीजदरातील ४० टक्क्यांची वाढ, शासकीय सवलतींतील कपात आणि मागणीतील घट यामुळे वस्त्रोद्योग संकटात आहे. त्यामुळे अनेक वस्त्रोद्योग गुजरातमध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता असून, अनेक उद्योगांना टाळे लागण्याची भीती आहे. राज्यातील इतर भागांप्रमाणेच पालघरमधील बांधकाम क्षेत्र गेल्या काही वर्षांपासून मंदीची स्थिती अनुभवत आहे.

त्याचा परिणाम रंग आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित इतर उत्पादकांवर झाला आहे. क्षमतेहून कमी उत्पादन घेण्यात येत असल्याने अनेक उद्योगांनी मनुष्यबळामध्ये कपात केली आहे.

सरकारकडून जाहीर करण्यात येणाऱ्या विविध धोरणांची अंमलबजावणी कधी होईल, याबाबत संदिग्धता असल्याने मंदीची स्थिती निर्माण झाल्याचे तारापूर येथील उद्योजकांच्या ‘टीमा’ संस्थेचे सचिव एस. आर. गुप्ता यांनी सांगितले.

सध्या बाजारात कापडाला मागणी कमी आहे. त्यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्र संकटात असून, अनेकांना उद्योग बंद करणे किंवा गुजरातमध्ये स्थलांतरित करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

सुंदरलाल बजाज, उद्योजक, तारापूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2019 3:48 am

Web Title: 40 percent decline in production textile in tarapur zws 70
Next Stories
1 आता साखर-टंचाई!
2 सर्वकार्येषु सर्वदा २०१९ : तिवरे गाव सावरणाऱ्या शाळेला आधाराची गरज!
3 जिल्हा बँकेच्या ४८ कोटींसाठी अध्यक्षांची मुख्यमंत्र्यांकडे धाव!
Just Now!
X