शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयांतर्गत येणाऱ्या दर्शनिका (गॅझेटिअर) निर्मितीचा गेल्या ४० वर्षांतील प्रवास कासवगतीने सुरू असल्याचे  दिसत आहे.
दर्शनिका निर्मितीसाठी राज्याचा स्वतंत्र विभाग आहे. प्रादेशिक भूस्वरूप, नद्या, वनसंपदा, स्थळांची भौगोलिक माहिती, लोकांच्या चालीरीती, राजघराण्यांचा इतिहास, अर्थव्यवस्था, महसूल प्रशासन आणि पुरावशेषांचा तपशील दर्शनिकांमध्ये असतो. कामाला गती देण्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात मनुष्यबळाचा अभाव आणि शासनाचे दुर्लक्ष   कारणीभूत असल्यानेच गेल्या ४० वर्षांमध्ये केवळ ९ दर्शनिकांची निर्मिती होऊ शकली. याचा उपयोग हल्ली काही प्रमाणात स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी करताना दिसतात.
साडेतीन वर्षांत एक दर्शनिका येणे अपेक्षित आहे. मात्र राज्यात १९६४ या वर्षांपासून दर्शनिका निर्मितीचे काम सुरू झाल्यापासून १९८० च्या दशकापर्यंत इंग्रजीतून २६ दर्शनिका प्रकाशित झाल्या. महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे की, ज्यांनी इंग्रजीतून सर्व जिल्ह्य़ाच्या दर्शनिकांची निर्मिती केली आहे. त्यानंतर मराठीतून दर्शनिका निर्मितीचे काम करावे अथवा नाही, यावर विचारमंथन होऊन १९७५ मध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ाची मराठी दर्शनिका तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र, या ४० वर्षांच्या काळात मराठीतील केवळ ९ जिल्ह्य़ांच्या दर्शनिकांची निर्मिती होऊ शकली. दोन जिल्ह्य़ांच्या दर्शनिकेचे काम पूर्णत्वाला पोहोचले आहे आणि एक जिल्हा हाती घेण्यात आला आहे. नागपुरातून इतिहासाचे प्राध्यापक गेडाम, सुरेश डोळके, शांता कोठेकर, डॉ. भा. ल. भोळे, भा. रा. अंधारे आणि डॉ. भाऊ लोखंडे  यांचे योगदान लाभले आहे.

तरीही तुलनेत राज्य पुढे..
* आता बुलढाणा आणि चंद्रपूरचे काम पूर्ण होत आले असून वाशिम जिल्ह्य़ाचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या विषयांच्या धरून एकूण १०५ दर्शनिका विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
* ई-गॅझेटिअरही नागरिकांसाठी उपलब्ध आहे. या संदर्भात गॅझेटिअर विभागाचे सेवानिवृत्त संपादक व सचिव डॉ. अरुणचंद्र पाठक यांनी मान्य केले की, या बाबतीत जी गती आणि मनुष्यबळ आवश्यक आहे ती नाही, पण इतर राज्यांच्या तुलनेत प्रादेशिक भाषेत दर्शनिका उपलब्ध करून देण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे.
* आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक इत्यादी राज्यांचे इंग्रजीतील दर्शनिकांचेच काम अजूनही सुरूच आहे. दर्शनिका प्रकाशित करायला उशीर होतो, याचा बभ्रा होतो.
* काढलेल्या किती दर्शनिका विकत घेऊन वाचल्या जातात? औषध वनस्पती, महाराष्ट्राचा प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास, भूमी आणि लोक, राज्याचा इतिहास अशा कितीतरी दर्शनिका विभागाने प्रकाशित केल्या आहेत.