ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची माहिती

राज्यातील गावागावात अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने बांधण्यात येणाऱ्या सभागृहांसाठी ४०० कोटी रु पयांची तरतूद ग्रामविकास विभागाने केल्याची माहिती ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी आज, शुक्रवारी चौंडी (ता. जामखेड) येथे बोलताना दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या २९४ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी, चोंडी येथे आयोजित कार्यक्रमात मंत्री मुंडे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. गणपतराव देशमुख होते. खा. छत्रपती संभाजीराजे, जलसंधारण तथा पालकमंत्री व कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष राम शिंदे, खा. विकास महात्मे, माजी मंत्री अण्णा डांगे, आमदार सर्वश्री भीमराव धोंडे, अनिल गोटे, सुरेश धस, शिवाजीराव कर्डिले, आदी उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य आणि औदार्याच्या मूर्तिमंत प्रतीक आहेत. त्यांनी निर्माण केलेल्या वाटेवरून चालणे आणि समाजाभिमुख काम करणे ही सर्वाची जबाबदारी आहे, असे सांगून मंत्री मुंडे म्हणाल्या, की अहिल्यादेवींनी सर्व जातिधर्माना घेऊन काम केले. दुष्काळाचा सामना करावा लागू नये म्हणून ठिकठिकाणी बारव बांधल्या. सर्व समाजासाठी धर्मशाळा उभ्या केल्या. त्यांचा आदर्श पुढे चालू ठेवण्याचे काम सर्वानी करावे. खासदार छत्रपती संभाजीराजे म्हणाले, दोनशेहून अधिक वर्षांपूर्वी अहिल्यादेवींनी केलेले कार्य महत्त्वाचे आहे. त्यांची दूरदृष्टी होती. छत्रपती शिवाजीमहाराज, छत्रपती संभाजीमहाराज, छत्रपती शाहू महाराज यांनीही सर्वसमावेशक असे काम केले. या महापुरु षांच्या या विचारांची आज गरज आहे.   पालकमंत्री शिंदे यांनी स्वागतपर प्रास्ताविकात जयंती आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा वसा आणि वारसा जपण्याचे आवाहन केले. आ. देशमुख यांनी, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षिणक व राजकीयदृष्टय़ा मागास धनगर समाजोन्नतीसाठी सर्वानी झटण्याची गरज व्यक्त केली. श्री. पडळकर यांनी धनगर समाजाच्या हक्काच्या मागण्यासाठी एकत्र येऊन मागण्यांचा पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे सांगितले. अण्णा डांगे, खा. महात्मे, श्री. पाचपुते आदींनी मनोगत व्यक्त केले. ‘यूपीएससी’ परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या स्नेहल धायगुडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी राज्यातून धनगर समाजबांधव व नागरिक मोठय़ा संख्येने चोंडी येथे आले होते तसेच त्यांनी शिल्पसृष्टीलाही भेट दिली.