वनविभागाची सर्जेपुरा भागात कारवाई

नगर : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वस्त्रदालनासमोर  उभारलेल्या कमानीत खोचलेली सुमारे ४०० मोरपिसे वन विभागाने जप्त केली. या वस्त्रदालनाच्या व्यवस्थापकाला नोटिशीद्वारे समज देण्यात आली आहे. यापुढे पुन्हा असा प्रकार घडल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे यांनी या व्यवस्थापकाला दिला आहे. त्याचबरोबर या पिसांसाठी मोरांची हत्या करण्यात आली आहे का, याची चौकशीही सुरू करण्यात आली आहे.

शहराच्या सर्जेपुरा भागातील वस्त्रदालनावर ही कारवाई करण्यात आली आहे. पुण्यामध्ये मुख्य शाखा असलेल्या या वस्त्रदालनाची गेल्यावर्षी नगरमध्ये शाखा सुरू करण्यात आली. या शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त ५ फूट रुंद व ८ फूट उंच अशी कमान उभारण्यात आली होती. या कमानीवर तीनशे ते चारशे मोरपिसे लावण्यात आली होती. या प्रकाराची वनविभागाला माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी थेटे, फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रवींद्र भोगे, वनपाल शर्मा, वनरक्षक राहणे, सुनीता काळे यांच्या पथकाने तेथे भेट दिली.

वन्यजीव अधिनियम १९७२ चे कलम २ व ९ अन्वये कारवाई करत वनविभागाने मोरपिसे जप्त केली. वन कायद्याप्रमाणे मोर हा प्रतिबंधित जीव आहे. या वस्त्रदालनाच्या व्यवस्थापकाला पुन्हा असा प्रकार करू नये अशी नोटिशीद्वारे समज देण्यात आली, तसेच पुन्हा असा प्रकार घडल्यास गुन्हा दाखल केला जाईल, असेही नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. या पिसांसाठी मोरांची हत्या झाली आहे का, यासंदर्भात ही चौकशी केली जात असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी थेटे यांनी सांगितले.