मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या चांदवड येथील मंगरुळ टोल नाक्यावर गुरुवारी रात्री मुंबईकडे जाणाऱ्या बोलेरोमधील मोठा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला. २ विदेशी बनावटीचे पिस्तुले, १७ रिव्हॉल्वर, २५ रायफल्स आणि ४ हजारापेक्षा जास्त काडतुसे या सगळ्याचा या शस्त्रसाठ्यात समावेश आहे. हा सगळा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गुरुवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मालेगाव तालुक्यातील वाके फाट्याजवळ शाई सुमन पेट्रोल पंप या ठिकाणी ही बोलेरो डिझेल भरण्यासाठी आली होती. पंपावर या बोलेरोमध्ये २७०० रुपयांचे डिझेल भरण्यात आले त्यानंतर चालकाने पैसे दिलेच नाहीत आणि तिथून पळ काढला. पेट्रोल पंप कामगाराने हा सगळा प्रकार पोलिसांना सांगितला आणि बोलेरोचा क्रमांकही त्यांना दिला.

‘पोलिसांनी वायरलेसद्वारे हा संदेश चांदवड पोलिसांना कळवला. चांदवड पोलिसांना ही बोलेरो दिसताच त्यांनी ती अडवली आणि तपासणी केली ज्यानंतर हा सगळा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. मोठ्या बंदुका ठेवण्यासाठी बोलेरोमध्ये काही खाचाही तयार करण्यात आल्या होत्या अशीही माहिती समोर आली आहे. ‘एबीपी माझा’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. नागेश बनसोडे, सलमान अमानुल्ला खान आणि बद्रीनुजमान अकबर बादशाह उर्फ सुमित या तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर उत्तर प्रदेशातील कानपूर या ठिकाणी असलेल्या शस्त्र गोदामातील चोरी केलेली शस्त्रे असल्याची माहिती त्यांनी दिली. कानपूर पोलिसांना पोलिसांनी तातडीने संपर्क केला. ज्यानंतर २५० शस्त्रांची चोरी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या सगळ्या प्रकारामागे टोळी आहे का? आणखी कोणी यात गुंतले आहे का? या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला आहे.