तब्बल ४१ लाख ६५ हजार रुपयांच्या वीजचोरी प्रकरणी, खालापूर तालुक्यातील दहिवली बांधकाम व्यवसायिकावर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यानी दिलेल्या तक्रारीनुसार भारतीय विद्युत अधिनियम २००३ च्या कलम १३५ अन्वये हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कर्जत पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

९ जुलै रोजी वावोशी प्रभागाचे सहाय्यक अभियंता अविनाश कोकीतकर आणि कार्यकारी अभियंता अमित गौरी हे त्यांच्या पथकासह दहिवली गावा जवळील  अरिहंत  आर्शिया गृहप्रकल्पात  अकराशे विजमीटरच्या नवीन प्रस्तावाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी नेमका सध्या किती वापर आहे. याची चौकशी करत असताना ही वीजचोरी उघडकीस आली. काही इमारतींमधील सदनिकांना तसेच पाणी पुरवठय़ासाठी वापरण्यात येणाऱ्या पंपाना अनधिकृतपणे जोडणी घेऊन विना मीटर वीज पुरवठा घेतला असल्याचे निदर्शनास आले. यानंतर पंचासमोर या वीजचोरीचा पंचनामा करण्यात आला. २२ महिन्यात जवळपास ४१ लाख ६५ हजार रुपयांची वीज चोरी झाल्याचे यात समोर आले.  यानंतर सदर बांधकाम व्यवसायिक कंपनीच्या दोन संचालकांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. कर्जत पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.