राज्याच्या अन्य भागांमधून जिल्हाधिकारी किंवा पोलीस विभागातर्फे जारी केले जाणारे ई-पास मिळवून गेल्या २३ दिवसांत ४१ हजार लोक सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत.

दरम्यान सोमवारपर्यंत जिल्ह्यातील एकूण  १७ रुग्ण करोनाबाधित आढळले असून त्यापैकी बहुसंख्य मुंबईहून येथे आलेले आहेत. या रुग्णांपैकी ७ रूग्ण पूर्णपणे तंदुरुस्त झाले असून १० रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. कुडाळ तालुक्यात एक ५२ वर्षीय महिला करोनाबाधित असल्याचे रविवारी निष्पन्न झाल्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या १७ झाली आहे. या रुग्णाच्या संपर्कातील एकूण ४० व्यक्तींपैकी ३० अतिजोखमीच्या संपर्कातील असून १० व्यक्ती कमी जोखमीच्या संपर्कातील आहेत. त्यांची चाचणी घेतली जात आहे. जिल्ह्यात सध्या कणकवली तालुक्यातील डामरे, वैभववाडी तालुक्यातील नाधवडे, मालवण तालुक्यातील हिवेळे आणि कुडाळ तालुक्यातील पणदूर गाव हे ४ कंन्टेनमेंट झोन आहेत. पणदूर या नवीन कंटेन्मेंट झोनमध्ये पणदूर, हुमरमळा आणि आणाव या तीन गावांचा समावेश आहे. या कंटेन्मेंट झोनमध्ये २८२ कुटुंबातील १ हजार ३४१ व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे.

जिल्हा रुग्णालयामार्फत आतापर्यंत  एकूण १ हजार ४३५ नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यापैकी १ हजार १५१ तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील १७ अहवाल सकारात्मक आले आहेत.  २८४ नमुन्यांचा अहवाल अजून प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या ८७ रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी ५७ रुग्ण डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटलमध्ये आणि ३० रुग्ण डेडिकेटेड कोवीड हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत सोमवाारी ४ हजार १८० व्यक्तींची तपासणी करण्यात आली.