लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला  शहरात एकाच दिवसांत तब्बल ४२ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका दिवसातील जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वाधिक रुग्ण संख्या आज शुक्रवारी नोंदवली गेली. एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यूही झाला. जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १३७ वर पोहोचली असून आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १११ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शहरात करोना संक्रमण अत्यंत झपाट्याने पसरत आहे. करोनाबाधितांच्या आकड्याने आज शंभरी ओलांडून १३७ चा आकडा गाठला. शुक्रवारी एकूण १९१ तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १४९ अहवाल नकारात्मक तर तब्बल ४२ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १३७ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यातील १२ जणांचा मृत्यू झाला. मृत्यूंपैकी एकाने आत्महत्या केली आहे.

आतापर्यंत १४ जणांनी करोनावर मात केली. सद्यास्थितीत १११ करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान एका ७८ वर्षीय  करोनाबाधित महिला रुग्णाचा उपचारादरम्यान आज दुपारी रुग्णालयात मृत्यू झाला. ही महिला १ मे रोजी रुग्णालयात दाखल झाली होती. ५ मे रोजी तपासणी अहवाल सकारात्मक आला होता. आज सकारात्मक आढळून आलेल्यांमध्ये सर्वाधिक २० रुग्ण हे बैदपुरा भागातील रहिवासी आहेत. राधाकिसन प्लॉट, मोहम्मद अली रोड, खैर मोहम्मद प्लॉट येथील प्रत्येकी ३, सराफा बाजार, अकोट फैल, जुने शहर येथील प्रत्येकी २, जुना तारफैल, गुलजार पुरा, आळशी प्लॉट, मोमीनपुरा, भगतसिंह चौक माळीपूरा, राठी मार्केट, काला चबुतरा येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

एकाच दिवसात तब्बल ४२ सकारात्मक रुग्ण आढळून आल्याने प्रशासन हादरले आहे. करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे काम युद्धस्तरावर सुरू करण्यात आले. जवळून संपर्कात आलेल्यांना दाखल करून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत एकदम वाढ झाल्याने अकोलेकरांची चिंता चांगलीच वाढली आहे.

करोना प्रतिबंधित क्षेत्र वाढले; प्रशासन सतर्क
अकोल्यात आज एकाच दिवसांत तब्बल ४२ रुग्ण आढळल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. अगोदरच प्रतिबंधित असलेल्या बैदपुरा भागातील सर्वाधित रुग्ण आहेत. शहरातील विविध भागातीलही रुग्ण आढळून आले. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रात वाढ झाली. शहरातील विविध परिसर आज करोनाने व्यापले आहेत. अकोलेकरांसाठी ही धोक्याची घंटा आहे.