पाच महिन्यांत पश्चिम विदर्भातील ४३२ शेतकऱ्यांना विषबाधा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रबोध देशपांडे, अकोला</strong>

पश्चिम विदर्भात बीटी कापसावर गुलाबी बोंडअळीचा या वर्षी सुमारे १० टक्के प्रादुर्भाव झाला आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडून कीटकनाशकांची फवारणी करण्यात येते. गेल्या वर्षी कीटकनाशकामुळे मोठय़ा प्रमाणात जीवितहानी झाल्यावर व्यापक जनजागृती व उपाययोजना करण्यात आली. मात्र, या वर्षीही शेतकरी घातक कीटकनाशकांच्या विळख्यात अडकल्याचे चित्र कायम आहे. या वर्षांत जीवितहानी नसली तरी कीटकनाशकामुळे पश्चिम विदर्भात पाच महिन्यांत तब्बल ४३२ शेतकऱ्यांना विषबाधा झाली. कीटकनाशकामुळे विषबाधा होण्यामागे शेतकऱ्यांचा निष्काळजीपणा मुख्य कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

पिकांवर पेरणीपासून ते उगवणीपर्यंत विविध प्रकारच्या कीड व रोगाचे आक्रमण होत असते. या किडीचे वेळेवर नियंत्रण न केल्यास उत्पादनामध्ये ३० ते ७० टक्क्यांपर्यंत घट येऊ  शकते. पिकावरील किडींची संख्या व त्यांचा प्रादुर्भाव सतत बदलत असतो. त्याला जैविक घटक व अजैविक घटक जबाबदार आहेत. त्यामुळे पिकांवरील किडींचे नियमित सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. नियमित सर्वेक्षणामुळे कीटकनाशकांच्या फवारण्या व त्यांची मात्रा कमी करता येते. तसेच कीटकनाशकांचा संतुलित वापर करता येतो. कीटकनाशकांचा योग्य वापर हा एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा महत्त्वाचा उद्देश आहे. मात्र, अद्यापही शेतकरी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करीत नसल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी कपाशीवर मोठय़ा प्रमाणात गुलाबी बोंड अळीचे आक्रमण झाले होते. त्यामुळे उत्पादन घटून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्यासोबतच रासायनिक कीटकनाशकाच्या फवारणीमुळे शेकडो शेतकऱ्यांना विषबाधाही झाली. या विषबाधेतून अनेक शेतकऱ्यांना प्राणाला मुकावे लागले. कीटकनाशकाचे गंभीर परिणाम पाहून या वर्षी सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांनी सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले. कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या संकल्पनेतून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागाने विदर्भातील ११ जिल्हय़ांमध्ये व्यापक जनजागृती मोहीम राबविली. पेरणीपूर्व मेळावे घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कृषी विद्यापीठाचे संशोधक व शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल होऊन शेतकऱ्यांना कीटकनाशक वापराविषयी धडे दिले. कृषी विद्यापीठाने शेकडो विद्यार्थ्यांमार्फत शेतकऱ्यांना मागदर्शन करण्याची विशेष मोहीम राबविली. गत वर्षी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव पाहता पूर्व हंगामी कपाशीची पेरणी करू नये व बिगर हंगामात जिनिंग मिल व इतर कापूस संकलन केंद्रांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पतंग पकडून नष्ट करण्यासाठी फेरोमेन सापळे लावण्याचे आवाहन केले होते. सामाजिक संघटनांकडूनही यासाठी पुढाकार घेतला. कृषी विद्यापीठाच्या या प्रयत्नांचा परिणाम दिसून आला. कीटकनाशकामुळे विषबाधा होण्याचे प्रमाण कमी झाले असले, तरी पूर्णत: या समस्येवर मात करण्यात यश मिळाले नाही.

यंदा विदर्भात पूर्व मान्सूनची लागवड नगण्य आहे. अशी लागवड विशेषत: अकोला, बुलढाणा व यवतमाळ जिल्ह्य़ांत झालेली आहे. पूर्व मान्सून कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. सुमारे १० टक्क्यांपर्यंत गुलाबी बोंडअळीने आक्रमण केले आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सापळ्यांचा वापर करण्यात आला. मात्र, त्यामुळे मर्यादित नियंत्रण मिळाल्याने शेतकऱ्यांकडून रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करण्यात आली. पश्चिम विदर्भातील अकोला, वाशीम, बुलढाणा, अमरावती व यवतमाळ या पाच जिल्हय़ांच्या कापूस पट्टय़ामध्ये एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कार्यकाळात ४३२ जणांना कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधा झाली. ऑगस्ट महिन्यातच तब्बल २८६ जणांना विषबाधा झाली आहे. या सर्वावर विविध शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले. या पाच महिन्यांमध्ये कीटकनाशकाच्या विषबाधेमुळे मृत्यू झाला नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. कीटकनाशकाची फवारणी करताना शेतकऱ्यांकडून होणारा निष्काळजीपणा, अप्रमाणित कीटकनाशकाची फवारणी, वारंवार फवारणीचे काम करणे आदी कारणांमुळे विषबाधा होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विषबाधा टाळण्यासाठी कीटकनाशक कंपन्यांना त्यासोबत सुरक्षा कीट देणे शासनाने अनिवार्य केले. मात्र, दुर्दैवाने काही शेतकऱ्यांकडून सुरक्षा कीटचा योग्य पद्धतीने वापर होत नसल्याने विषबाधा झाल्याचेही आढळून आले आहे. विषबाधा टाळण्यासाठी फवारणी तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक आहे.

सध्या पश्चिम विदर्भात दमट, उष्ण व प्रखर उन्हाचा पार अशा प्रकारचे वातावरण आहे. कपाशीमध्ये हवा व ऊन खेळती नसल्याने पिकामधील सूक्ष्म वातावरण रसशोषक किडी व बोंड अळयांना पोषक आहे. त्यामुळे फवारणी तंत्रज्ञानाचा वापर करून विषबाधा होऊ  नये याची काळजी घेण्याचे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

ठेका पद्धतीचा जीवघेणा परिणाम

सध्या ठेका पद्धतीने कीटकनाशकांची फवारणी करून घेण्याची पद्धत आहे. काही शेतमजूर हंगामामधे सतत फवारणीचीच कामे करीत असल्याने त्यांच्यावर जीवघेणा घातक परिणाम होतो. सततच्या कीटकनाशकाच्या संपर्कामुळे त्वचेची अ‍ॅलर्जी, खाज, सतत डोकेदुखी, अशक्तपणा, मळमळ, चक्कर येणे, दृष्टी कमी होणे आदी लक्षणे दिसून येतात. दाटलेल्या पिकामध्ये फवारणी करताना द्रावण अंगावर, डोळ्यात व श्वासाद्वारे नाकामध्ये जाते. तसेच फवारणीच्या वेळी तंबाखू खाणे, विडी ओढणे, हात न धुता पाणी पिणे आदी प्रकार सर्रास आढळून आले.

अशी घ्यावी काळजी

फवारणी करताना शिफारस केलेली दर्जेदार कीटकनाशके खरेदी करावीत, तणनाशके फवारणीचा पंप चुकूनही कीटकनाशके फवारणीसाठी वापरू नये, कीटकनाशकाची मात्रा फवरणीसाठी मोजून घ्यावी.

फवारणी करताना संरक्षक कपडे, बुट, हात मोजे, नाकावरील मास्क आदीचा वापर करावा, पंपाचे नोझलमधील कचरा तोंडाने फुंकून काढू नये, कीटकनाशकाचा शरीराशी सरळ संपर्क आल्यास पाण्याने स्वच्छ धुवावे,

कीटकनाशकाचा पर्यावरणाशी कमीत कमी संपर्क येईल याची काळजी घ्यावी, कीटकनशके फवारलेल्या शेतामध्ये इशारा फलक लावावा आदी काळजी घेण्याच्या सूचना कृषी विद्यापीठाने दिल्या आहेत.

कीटकनाशकाची फवारणी करताना शेतकऱ्यांमध्ये काळजी घेण्याचा अभाव जाणवतो. त्यामुळे शेतकऱ्यांना कीटकनाशकामुळे विषबाधा होत आहे. आरोग्य विभागाकडून बाधित रुग्णांवर योग्य उपचार करण्यात येत असल्याने या वर्षी कीटकनाशकामुळे पश्चिम विदर्भात मृत्यू झाला नाही.

 – डॉ. आर. एस. फारुकी, उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ.

शेतकऱ्यांना कीडकनाशकापासून विषबाधा होऊ नये म्हणून कृषी विद्यापीठाने हंगामाच्या सुरुवातीपासून व्यापक जनजागृती केली. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी विषबाधा होण्याचे प्रमाण कमी आहे. यावर १०० टक्के आळा बसण्याच्या दृष्टीने विद्यापीठाकडून प्रयत्न करण्यात येत आहे.

– डॉ. विलास भाले, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

* अकोला, वाशीम, बुलढाणा, अमरावती व यवतमाळ या पाच जिल्हय़ांच्या कापूस पट्टय़ामध्ये एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कार्यकाळात ४३२ जणांना कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधा झाली. ऑगस्ट महिन्यातच तब्बल २८६ जणांना विषबाधा झाली आहे.

* पिकांवर पेरणीपासून ते उगवणीपर्यंत विविध प्रकारच्या कीड व रोगाचे आक्रमण होत असते. या किडीचे वेळेवर नियंत्रण न केल्यास उत्पादनामध्ये ३० ते ७० टक्क्यांपर्यंत घट येऊ  शकते.

कीटकनाशकामुळे झालेली विषबाधा

अकोला          १९४

अमरावती      ५५

बुलढाणा        ४४

वाशीम           २५

यवतमाळ      ११४

एकूण             ४३२

(आकडेवारी एप्रिल ते ऑगस्ट महिन्यातील आहे.)

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 432 farmers poisoning in five months due to pesticide in western vidarbha
First published on: 26-09-2018 at 02:14 IST