कराड : कराड उपजिल्हा रुग्णालयातील करोनाबाधित रुग्णाच्या सहवासित म्हणून दाखल असणाऱ्या १० वर्षीय मुलाचा कोव्हिड-१९चा चाचणी अहवाल सकारात्मक आल्याने सातारा जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या ४४ झाली. याचवेळी करोना संशयित ४४ जणांचे चाचणी अहवाल नकारात्मक येताना, जिल्ह्यात ठिकठिकाणी ७२ जण अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल झाले आहेत.

सध्या जिल्ह्यात ३४ कोव्हिड-१९ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आजवर ८ करोनाग्रस्त उपचाराअंती सुखरूप स्वगृही परतले आहेत. आजचे अनुमानित ७२ जण तसेच करोनाबाधित म्हणून १४ दिवस उपचार घेतल्यानंतर एका रुग्णाचे असे एकूण ७३ जणांच्या घशाच्या स्त्रावांचे नमुने पुण्याच्या बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

दरम्यान, तीव्र संक्रमित भागात संपूर्ण टाळेबंदीसह जमावबंदीत व कडक निर्बंध लागू असल्याने तेथील लोकांचे जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठय़ाअभावी हाल सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर कराड शहरात उद्या १ मेपासून भिलवाडा पॅटर्नच्या धर्तीवर औषधांसह भाजीपाला, किराणा माल असा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जाणार आहे. याबाबत प्रांताधिकारी उत्तम दिघे यांचे अध्यक्षतेखाली तसेच प्रशासन, पोलीस व कराड पालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक होऊन त्यात कराडकरांना घरपोच जीवनावश्यक वस्तू देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच पद्धतीने जिल्ह्यात संपूर्ण टाळेबंदीच्याठिकाणी जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचा विचार केला जात असल्याचे यंत्रणेने म्हटले आहे.

सांगली जिल्ह्यात विनापरवाना प्रवेश; फौजदारासह चार जणांविरुद्ध गुन्हा

सांगली : विनापरवाना खासगी मोटारीने सांगली जिल्ह्यात प्रवेश केल्याप्रकरणी मुंबईतील एका फौजदारासह चार जणांविरुध्द कासेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गस्तीवरील पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून वाहन पुढेच नेण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून या मोटारीला पकडले.याबाबत माहिती अशी की, मुंबईतील डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस फौजदार विजय गावडे, वरळी वाहतूक शाखेकडील हवालदार संतोष जाधव, इर्षदा जाधव, आणि सोहनी जाधव असे चार जण मोटारीतून एमएच ४८ एपी ४८३१ येत असताना कासेगाव पहाऱ्याच्या ठिकाणी अडविण्याचा प्रयत्न झाला. मात्र ही मोटार तशीच पुढे नेण्यात आली. या मोटारीचा पाठलाग करून नेल्रे येथे पकडण्यात आले. या सर्वावर  कासेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.