सोलापूर : इराक व इराणमध्ये तीर्थयात्रेसाठी गेलेले महाराष्ट्रातील सहाशे यात्रेकरू इराणची राजधानी तेहरानमध्ये अडकले आहेत. यात सोलापूर जिल्ह्य़ातील सुमारे ४४ यात्रेकरूंचा समावेश आहे. ‘करोना’च्या साथीमुळे इराक व इराणसह तेथील अन्य देशांनी सीमा बंद केल्यामुळे या भारतीय यात्रेकरूंना गेल्या आठ दिवसांपासून तेथेच अडकून पडावे लागले आहे. कोल्हापूरच्या साद टुर्स कंपनीने ही यात्रा आयोजिली होती.

इराण-इराकमध्ये अडकलेल्या यात्रेकरूंमध्ये सोलापूर जिल्ह्य़ातील एकटय़ा अकलूजमधील १२ यात्रेकरूंचा समावेश आहे. त्यांची नावे अशी: हाजी मौलाना अ. गनी लतीफ शेख, कय्युम अब्बास मुलाणी, मुस्तफा वहाबोद्दीन सय्यद, जिलानी युसूफ शेख, म. रफिक इलाही मुल्ला, जिब्राही रसूल नदाफ, इस्माईल गुलाब मुजावर, शब्बीर गफूर शेख, मेहमूद काझी, यासीन अली नदाफ, दस्तगीर शेख व इरफान बागवान यांचा समावेश आहे. हे यात्रेकरू गेल्या २० फेब्रुवारी रोजी मुंबईहून विमानाने इराणची राजधानी तेहरानकडे रवाना झाले होते. इराकची राजधानी बगदाद येथे प्रसिध्द सुफी संत हजरत गौस पाक जिलानींचा दर्गाह तसेच मोहम्मद पैगंबरांचे नातू हजरत इमामहुसेन व त्यांच्या कुटुंबीयांनी ज्या करबलाच्या युध्दात हौतात्म्य पत्करले तेथील स्थळांचे दर्शन घेण्यासाठी हे यात्रेकरू गेले होते.

या यात्रेकरूंमध्ये प्रामुख्याने तीन जत्थे होते. यात दोन यात्रेकरूंचा जत्था २१ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यत तर एक जत्था १३ मार्चपर्यंत तेथे तीर्थयात्रा करणार होता. २१ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंत होणाऱ्या तीर्थयात्रेमध्ये २९ यात्रेकरूंचा जत्था आहे, तर अन्य दोन जत्थ्यांमध्ये १५ यात्रेकरू आहेत. हे सर्व यात्रेकरू इराकमध्ये पोहोचल्यानंतर तेथून पुढील यात्रेसाठी जाण्यास यात्रेकरूंना मज्जाव करण्यात आला असून त्यांना तेथेच अडकावून ठेवण्यात आले आहे. यापैकी बहुसंख्य यात्रेकरू तेहरान शहरात हॉटेल जिबा येथे गेल्या आठ दिवसांपासून ताटकळत थांबले आहेत. यातील यात्रेकरूंपैकी अकलूजचे जिलानी युसूफ शेख व जिब्राहील नदाफ यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपली व्यथा मांडली. ‘करोना’च्या साथीने जगभर पसरत थैमान घालायला सुरुवात करण्यापूर्वीच इराक व इराण आदी देशांनी तेथील सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे आम्ही गेले आठ दिवस एकाच ठिकाणी अडकून पडलो असून भीतीच्या छायेखाली वावरत असताना परमेश्वराकडे प्रार्थना करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.

तीर्थयात्रा पूर्ण होवो वा न होवो, पण आम्हाला मायदेशी सुखरूपपणे पोहोचायचे आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. चीननंतर दक्षिण कोरिया आणि इराणमध्ये ‘करोना’चा संसर्ग वाढल्याचे सांगितले जाते.

अकलूजमधील १२ यात्रेकरू इराणमध्ये अडकले असून त्यांच्याशी संपर्क झाला आहे. या सर्वाना सुखरूपपणे भारतात परत येण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी आपण संपर्क साधला आहे. तसेच पंतप्रधान कार्यालयाशीही पत्रव्यवहार केला आहे. केंद्र सरकार यासंदर्भात लवकरच पावले उचलून आमच्या भागातील यात्रेकरूंची मायभूमीत परत येण्यासाठी व्यवस्था होईल, असा विश्वास वाटतो.

-रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी खासदार