महाराष्ट्रात ४१४ पोलीस कर्मचारी आणि ४२ पोलीस अधिकारी करोना पॉझिटिव्ह आहेत अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नात राज्याचे पोलीस हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या सगळ्या प्रयत्नांमध्ये मुंबईतील तीन आणि पुण्यातील एक अशा चार पोलीस वीरांना त्यांचा जीव गमवावा लागला ही बाब दुर्दैवी आहे असंही देशमुख यांनी म्हटलं आहे. तसंच ज्या ४५६ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत असंही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं.

पोलिसांना जर करोनाची लक्षणं दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी राज्यात स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. राज्यात एकूण ४ हजार ८०८ रिलिफ कँप आहेत ज्यामध्ये ४ लाख ४२ हजार २९८ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे असंही देशमुख यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्रात आणि खास करुन मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढते आहे. अशात आता पोलिसांनाही करोनाचा त्रास जाणवू लागला आहे. यातून लवकरात लवकर बाहेर येण्यासाठी हे प्रयत्न सर्वतोपरी केले जात आहेत.