दोन ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि खासगी डॉक्टरसह रत्नागिरी  जिल्ह्य़ात नव्याने ४७ करोनाबाधित रूग्ण सापडले असून हा या महामारीच्या प्रादूर्भावाचा नवा उच्चांक आहे.

याचबरोबर जिल्हा कारागृहातील ८ कैदी आणि २ पोलीस कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यतील करोनाबाधित रुग्णांची संख्या ६६१ वर पोचली आहे.

या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे- हर्णे (ता. दापोली), १२ जेल रोड क्वार्टर्स (रत्नागिरी) १०, रत्नागिरी ३, वेरळ, लोटे, आष्टी, घरडा कॉलनी (ता. खेड), खेड, खेर्डी (ता. चिपळूण) आणि ब्राह्मण वाडी (ता. संगमेश्वर) प्रत्येकी २, पोलिस अधीक्षक कार्यालय, कारवांचीवाडी , परकार रुग्णालय , आडिवरे (ता. राजापूर) , खोपी (ता. खेड) , वेरळ (ता. खेड) , कापरे वाडी (चिपळूण) आणि मंडणगड प्रत्येकी १ (ता.खेड)  यांचा समावेश आहे.

चोविस तासात जिल्ह्यत कोरोनाचे बाधित रुग्ण आल्यामुळे यंत्रणा हादरली आहे. कोविड योद्धा म्हणून काम करणारे यामध्ये बाधित झालेले आहेत. यामध्ये उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य कर्मचारी, अधिकाऱ्यांची तपासणी सुरू झालेली आहे. त्यांचे अहवाल अजून आलेले नाहीत. सध्या एकूण १८६ रुग्णांवर उपचार चालू आहेत. जिल्ह्यत सध्या ५३ ‘प्रतिबंधित क्षेत्रे’ असून संस्थात्मक विलगीकरणात कक्षात ८० संशयित करोना रुग्ण दाखल आहेत.

प्रयोगशाळेत चाचणी किटचा तुटवडा ?

दरम्यान करोनाचा वाढत प्रादूर्भाव आणि वाढत जाणाऱ्या तपासण्यांमुळे जिल्हा रूग्णालयातील प्रयोगशाळेत चाचणी किटचा तुटवडा भासू लागल्याने आरोग्य विभागापुढे नवा पेच निर्माण झाला आहे. ९६ चाचण्या होऊ शकणारी ५० किट मागवली होती, मात्र त्यापैकी ३० आली आहेत.

रुग्णांची संख्या वाढत असल्याने वेळेवर किट न आल्यास तपासणीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवीन किट खरेदी करण्याची प्रक्रिया टेंडर प्रक्रियेमध्ये अडकल्याची माहिती पुढे आली आहे.