व्यवसायासमोरील संकटांमध्ये वाढ; उत्पादनांचे प्रमाणही कमी
राज्यातील सहकारी हातमाग संस्था बंद पडण्याचे सत्र सुरूच असून तोटय़ातील संस्थांची संख्या ४७ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे वास्तव समोर आले आहे. राज्यात सध्या ४६.६ टक्के हातमाग, तर ५५.९ टक्के यंत्रमाग संस्था तोटय़ात आहेत. मोठय़ा कुटीर उद्योगांमध्ये मोडणाऱ्या हातमाग व्यवसायासमोरील संकटे वाढली असून हातमागांवरील उत्पादनांचे प्रमाणही कमी होत आहे.
विणकरांच्या कल्याणासाठी अनेक घोषणा केल्या जातात, निधीचीही तरतूद करण्यात येते. मात्र, हा निधी विणकरांपर्यंत पोहोचत नसल्याची ओरड आहे. सध्या राज्यात ६४६ सहकारी हातमाग संस्था अस्तित्व टिकवून असल्या, तरी त्यापैकी ३०१ संस्था तोटय़ात आहेत. पाच वर्षांपूर्वी राज्यात ६८६ संस्था होत्या. ती संख्या आता कमी झाली आहे. राज्यातील २ हजार ९१ यंत्रमाग संस्थांपैकी ११७० संस्था तोटय़ात गेल्या आहेत, अशी माहिती सहकार आयुक्त कार्यालयातील सूत्रांनी दिली. सहकारी हातमाग संस्थांच्या सभासदांची संख्याही झपाटय़ाने कमी होत असून पाच वर्षांपूर्वी या संस्थांचे ९२ हजार ८०० सभासद होते, त्यांची संख्या ८० हजारापर्यंत खाली आली आहे. या संस्थांच्या उत्पादनांचे मूल्यही पाच वर्षांमध्ये ७२ कोटी रुपयांपर्यंत कमी झाले आहे. यंत्रमागांचीही हीच अवस्था असून त्यांच्या उत्पादनाचे मूल्य यंदा केवळ ६८ कोटी रुपये इतके होते. हातमाग उद्योगातील बहुसंख्य विणकर दुर्बल घटकातील आहेत. हातमाग व्यवसायात अल्पभांडवली खर्चात जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता असली, तरी यांत्रिकीकरणाचे प्रस्थ वाढल्याने या उद्योगावर मर्यादा आल्या. तरीही काही खास प्रकारच्या हातमाग कापडाला मागणी आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून विणकरांच्या विकासासाठी अनेक योजना राबवल्या जातात. हातमाग सहकारी संस्थांना अर्थसहाय्यही दिले जाते. एकात्मिक हातमाग विकास समूह योजनेसाठी सर्वाधिक निधी देण्यात आला होता तरीही सहकारी हातमाग संस्थांची पडझड थांबू शकलेली नाही.
यंत्रमाग संस्थांचीही अशीच परवड सुरू आहे. अनेक शहरांमध्ये यंत्रमाग संस्थांमधून मोठय़ा प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत होती, पण ती आता मंदावली आहे. या क्षेत्रातील अनेक कामगारांवर बेकारीचे संकट ओढवले आहे. हातमाग किंवा यंत्रमागावरील कापडाला फारशी मागणी नाही, अशी ओरड आहे. हातमाग व्यवसायावर सुताच्या वाढत्या किमतीचाही परिणाम झाला आहे. सूत पुरवठय़ातील अनियमिततेमुळे विणकरांच्या अडवणी वाढतात. हातमागावर साडी, धोतर, सतरंजी, चादरी, टॉवेलचे उत्पादन करण्याची क्षमता असून त्यासाठी लागणाऱ्या सुताचा पुरवठा स्थानिक बाजारातून होतो, सुताच्या किमती वाढल्यास बाजारातील स्पध्रेत टिकाव धरणे विणकरांसाठी कठीण होऊन बसते. केंद्र सरकारच्या एकात्मिक हातमाग विकास योजनेचा हातमाग व्यवसाय समूहांना फायदा झाला असला, तरी सहकारी संस्थांसमोरील संकटे संपलेली नाहीत.

संस्था बंद पडण्याचे कोडे
राज्य सरकारने राज्यातील प्राथमिक हातमाग विणकर संस्थांना ५० टक्के कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून गेल्या वर्षी दिलासा मिळवून दिला होता. हातमाग उद्योगांचे पुनरुज्जीवन, सुधारण आणि पुनर्रचना ही योजना राज्यात राबवण्यात येत आहे, तरीही हातमाग संस्था बंद पडण्याचे प्रमाण कमी होण्याची चिन्हे का दिसत नाही, हे कोडे विणकरांसह नियोजनकर्त्यांनाही पडले आहे.