करोनाचा फैलाव सोलापुरात झपाट्याने वाढत असून रविवारी एकाच दिवशी उच्चांकी ४८ करोनाबाधित रूग्ण सापडले. यात नऊ पोलिसांचाही समावेश आहे. याशिवाय काही आरोग्य कर्मचाऱ्यांनाही करोनाची बाधा झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील करोनाबाधित रूग्णांची संख्या २६४ वर पोहोचली असून यात १४ मृतांचा समावेश आहे.

रविवारी सायंकाळी सहापर्यंत करोनाशी संबंधित संशयित रूग्णांची वैद्यकीय चाचणी केलेले १३२ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४८ व्यक्तींना करोनाबाधा झाल्याचे दिसून आले. यात २९ पुरूष तर १९ महिला आहेत. आज नव्याने आढळून आलेल्या रूग्णांपैकी सर्वाधिक ८ रूग्ण सिध्देश्वर पेठेतील असून त्याशिवाय शनिवार पेठेत सात रूग्ण तर लष्कर (सदर बझार) येथे चार रूग्ण सापडले. एकूण ३२ ठिकाणी रूग्ण सापडले.

शहर पोलीस दलात खळबळ

धक्कादायक बाब म्हणजे एकाचवेळी नऊ पोलिसांनाही करोनाची बाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यात सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी भागातील संजीवनगरासह गजानन नगर (जुळे सोलापूर), बजरंगनगर (होटगी रोड), सम्राट चौक, मंत्री-चंडक नगर (भवानी पेठ), रविवार पेठ, मुरारजी पेठ पोलीस वसाहत तसेच जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील पाटकूल, ढोक बाभुळगाव आदी ठिकाणी राहणाऱ्या पोलिसांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण १६ पोलीस करोनाबाधित झाल्याने पोलीस यंत्रणाही हादरून गेली आहे.

जिल्ह्यात ग्रामीण भागात मोहोळ व सांगोला येथे दोन करोनाबाधित रूग्ण यापूर्वी सापडले होते. त्यानंतर आता मोहोळ तालुक्यात पुन्हा तीन रूग्ण आढळून आले आहेत. बहुसंख्य रूग्ण एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे करोनाबाधित झाले आहेत.