पंतप्रधान जन-धन योजनेंतर्गत पहिल्याच दिवशी जिल्हय़ात ४७ हजार ६८० कुटुंबांचे विविध बँकांमध्ये बचत खाते उघडण्यात आले. यात जिल्हय़ाची अग्रणी बँक असलेल्या सेंट्रल बँकेत सर्वाधिक म्हणजे १० हजार ५१५ खात्यांचा समावेश आहे.
केंद्र सरकारच्या या योजनेचा देशभर गुरुवारी प्रारंभ झाला. नगरला जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला. या पहिल्याच दिवशी जिल्हय़ात ४७ हजार ६८० कुटुंबांचे बचत खाते उघण्यात आले. महाराष्ट्र बँकेत ९ हजार ३००, स्टेट बँकेत हजार ८६१ आणि आयडीबीआय ४ हजार यांचा यात प्रमुख वाटा आहे.
देशातील प्रत्येक कुटुंबाचे कोणत्याही बँकेत किमान एक बचत खाते असावे, अशी केंद्र सरकारची भूमिका असून त्यादृष्टीनेच ही योजना आखण्यात आली आहे. आधार कार्डाशी संलग्न बँक खात्यामुळे प्रत्येक नागरिकाला बँक सुविधेचा फायदा मिळून त्यांची आर्थिक प्रगती व्हावी असी संकल्पना यामागे आहे. दुर्बल घटकांना बँकेशी जोडणे आणि त्यांना या सुविधेचा लाभ मिळवून देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. आधार कार्ड असेल तर हे खाते उघडण्यासाठी अन्य कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही, शिवाय हे खाते शून्याधारित आहे. त्यावर किमान शिल्लक ठेवण्याची कोणतीच अट नाही. या खात्याबरोबरच संबंधित खातेदाराला रूपे डेबिट कार्ड आणि १ लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण देण्यात येणार आहे. सरकारी योजनांचा लाभ घेण्यास खातेदार पात्र ठरणार असून या खात्यात देशातून कुठूनही रक्कम जमा करता येईल, शिवाय कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढता येतील.
किमान सहा महिने खाते उत्तम चालवल्यास अशा खातेदाराला ओव्हरड्राफ्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, पुढच्या वर्षी स्वातंत्र्यदिनी या योजनेचा पुढचा टप्पा सुरू होणार आहे. त्या वेळी विमा व निवृत्तिवेतनावर यात भर देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कवडे यांनी दिली.