08 March 2021

News Flash

दशकात ४८२ हत्तींचा वीज प्रवाहामुळे मृत्यू

भारतीय वन्यजीव संरक्षण संस्थेची माहिती

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

भारतीय वन्यजीव संरक्षण संस्थेची माहिती; फ्लेमिंगोलाही फटका

भारतात गेल्या दहा वर्षांत वीज प्रवाहामुळे तब्बल ४८२ हत्ती मृत्युमुखी पडले आहेत. त्यापाठोपाठ वीजप्रवाहाचा सर्वाधिक फटका फ्लेमिंगो पक्ष्याला बसला आहे. सुमारे १८१ फ्लेमिंगो २०१० ते २०१६ या काळात मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गासंदर्भात असणारी मार्गदर्शक तत्त्वे योग्यरित्या कार्यान्वित होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारतात जंगलाच्या आत आणि लागून असणाऱ्या मानवी वसाहती, शेती, वृक्षारोपण असलेल्या जागा आदी ठिकाणाहून जाणाऱ्या वीज वाहिन्या, विद्युत तारांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने होत नाही. त्यामुळे हत्ती, वाघ, अस्वल, माकड आणि फ्लेमिंगो पक्षी त्यांच्या संपर्कात येतात. परिणामी, विजेचा झटका लागून त्यांचा मृत्यू होतो. पक्ष्यांना याचा सर्वाधिक फटका बसतो. भारतीय वन्यजीव संरक्षण संस्थेने २००८ ते २०१७ दरम्यान वीजप्रवाहामुळे मृत्युमुखी पडलेल्या वन्यप्राणी आणि पक्ष्यांची आकडेवारीच जाहीर केली आहे.

संरक्षित वन्यजीव क्षेत्रात केंद्र सरकार विकासाचे प्रकल्प मंजूर करत आहे. त्यामुळे वन्यप्राणी आणखी धोकादायक स्थितीत आले आहेत. संरक्षित क्षेत्रातून जाणाऱ्या वीजवाहिनीची योग्य देखभाल न केल्यामुळे, शिकारीसाठी शिकाऱ्यांनी केलेल्या वीजप्रवाहाच्या वापरामुळे आणि मानव व वन्यजीव संघर्षांत शेतकऱ्यांकडून लावण्यात येणाऱ्या वीजप्रवाहामुळे हे मृत्यू झाले आहेत. हे मृत्यू टाळण्यासाठी राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य किशोर रिठे यांनी अनेक उपाययोजना सुचवल्या होत्या. वन्यजीव अधिवासातून जाणाऱ्या वीजवाहिन्या भूमिगत करण्याचा प्रस्ताव त्यावेळी मान्य देखील झाला होता.

मात्र, यासाठी लागणारा खर्च अधिक असल्याने  वीज वितरण कंपन्या आणि वनखाते या दोघांनीही ही बाब गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे वीजप्रवाहाने वन्यप्राण्यांच्या मृत्यूची होणारी मालिका अखंडितपणे सुरू आहे.

वीजप्रवाहामुळे हत्तीचे सर्वाधिक मृत्यू होतात. कारण बरेचदा वीज तारा लोंबकळत असतात. वीजतारांनाही सोंडेने स्पर्श केल्यानंतर त्यांचा मृत्यू होतो. तसेच हत्तीमुळे होणारे पिकांचे नुकसान अधिक आहे. ते वाचवण्यासाठी वीजप्रवाहाचा वापर केला जातो आणि यात हत्तीचा मृत्यू होतो. महाराष्ट्रात मानव-वन्यजीव संघर्षांदरम्यान लावण्यात येणारे आणि शिकाऱ्यांनी लावलेले वीजप्रवाह यामुळे वन्यप्राणी मृत्युमुखी पडतात.    – नितीन देसाई, संचालक मध्यभारत, वाईल्डलाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया

ओडिशा आघाडीवर

कर्नाटक, आंधप्रदेश, आसाम, तामिळनाडू, छत्तीसगड, झारखंड, केरळ, ओडिशा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड या राज्यांमध्ये विद्युत प्रवाहामुळे सर्वाधिक वन्यप्राणी मृत्युमुखी पडले आहेत. त्यापैकी ओडिशा हे राज्य आघाडीवर आहे. गुजरात आणि महाराष्ट्रात फ्लेमिंगो पक्षी आणि बिबटय़ाच्या मृत्यूच्या सर्वाधिक घटना आहेत.

बिबटे, वाघ आणि अस्वलही

२००८ ते २०१७ या नऊ वर्षांच्या कालावधीत ४८२ हत्ती, ८६ बिबटे, ३३ वाघ, २३ अस्वल, १२ आशियाई सिंह आणि ११ गौर यांचा मृत्यू वीजप्रवाहाने झाला आहे, तर २०१० ते २०१६ या कालावधीत १८१ फ्लेमिंगो, ६४ मोर मृत्युमुखी पडले आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 1:50 am

Web Title: 482 elephants death due to electric current
Next Stories
1 विज्ञानातील प्रज्ञावंताच्या निधनाने नागपूरकरही हळहळले
2 लोकजागर : अस्वस्थ तरुण-बेपर्वा राज्यकर्ते!
3 कविवर्य सुरेश भट स्मृतिदिनाचा महापालिकेला विसर
Just Now!
X