राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत रायगड जिल्ह्य़ातील पाच मासेमारी केंद्रांचा विकास केला जाणार आहे. यात उरणमधील कोंडरीपाडा, अलिबागमधील वरसोली आणि चारमळा, मुरुड तालुक्यातील बोर्ली मांडला आणि मुरुड या मासेमारी केंद्रांचा विकास केला जाणार आहे. यातील चार मासेमारी जेटय़ांच्या विकासाचे काम सुरू झाले असले तरी मुरुडमधील जेटीचे काम मात्र रखडले आहे. कोळी समाजातील वाद याला कारणीभूत ठरले आहेत.
कोकण विकास योजनेंतर्गत कोकणातील चार जिल्ह्य़ांतील ३० मासेमारी केंद्रांच्या विकासाची योजना तयार करण्यात आली होती. यातील १९ मासेमारी केंद्रांच्या कामाला मंजुरी मिळाली होती. मात्र कालांतराने ही सर्व कामे राष्ट्रीय कृषी विकास योजनेत वर्ग करण्यात आली.
या योजनेंतर्गत कोंडरीपाडा जेटीच्या विकासासाठी ५ कोटी ४५ लाख, वरसोली जेटीसाठी ३ कोटी ७७ लाख, चारमळा जेटीच्या विकासासाठी ३ कोटी २९ लाख, बोर्ली मांडल्यातील जेटीसाठी २ कोटी २४ लाख, मुरुड जेटीसाठी १ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी चार जेटींची काम सुरू झाली असली तरी मुरुडमधील जेटीचे काम मात्र रखडले आहे.
कोळी समाजातील मतभेद याला कारणीभूत ठरत आहेत. जेटीच्या कामासाठी जयभवानी मच्छीमार संस्था आणि सागरकन्या मच्छीमार संस्थांच्या मागील जागा निश्चित करण्यात आली होती. पुण्याच्या सीडब्लूपीआरएस या संस्थेने या जागेची पाहणी केली होती. टेक्निकल मंजुरीनंतर कामाला सुरुवातही होणार होती. मात्र कोळी समाजातील मतभेदांमुळे जेटीचे काम सुरू होऊ शकलेले नाही. जेटीच्या कामामुळे खाडीच्या भागात गाळ साचून खाडीचे मुख बंद होण्याची भीती काही लोकांना वाटते आहे. मात्र यात काही तथ्य नसल्याचे दुसऱ्या गटाला वाटते आहे.
मुळातच मुरुड तालुक्यात सध्या एकही मासेमारी लॅण्डिंग सेंटर अस्तित्वात नाही. त्यामुळे मासे विक्रीसाठी मच्छीमारांना थेट मुंबईतील ससून डॉक बंदरावर जावे लागते आहे. यासाठी प्रत्येक वेळा १४० लिटर डिझेल खर्च करावे लागते. यात मच्छीमारांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे मुरुडमधील काही बडे मच्छीमार इतर मच्छीमारांकडील मच्छी गोळा करून ससून डॉकला नेतात आणि नंतर ते मच्छीमारांना पैसे देतात. जर मुरुडला लॅण्डिंग सेंटर झाले तर या बडय़ा मच्छीमारांचे महत्त्व कमी होणार आहे. त्यामुळे जेटीच्या कामाला विरोध होत आहे.
जेटी न होण्यामागे राजकारण आहे. मच्छीमारांचे हित लक्षात घेऊन जेटीचे काम तातडीने व्हायला पाहिजे अशी प्रतिक्रिया जयभवानी मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष महेंद्र गारदी यांनी दिली आहे.