जीप झाडावर आदळून झालेल्या अपघातात भावी वरासह पाच ठार तर नऊ जण जखमी झाले. हा अपघात ऐनीपकी धरमलेवाडी (ता. राधानगरी) जवळ रविवारी उशिरा झाला.
मृतांमध्ये मारुती पांडुरंग धरमले (वय २१), पांडुरंग दौलू धरमले (वय ६०), रंगराव शंकर वरुटे (वय २८), अजित तुकाराम जाधव (वय २६), सुनील गणपती वरुटे (सर्व रा. धरमलेवाडी) यांचा समावेश आहे, तर शंकर बाळू कवडे, रवींद्र बाजीराव कवडे, बाजीराव लक्ष्मण कवडे, जयवंत पांडुरंग धरमले, अरुण पांडुरंग कवडे, शिवाजी बाळू कवडे, शंकर दौलू कवडे, जयवंत पांडुरंग धरमले, साउबाई पाटील (रा. फराळे) जखमी झाले आहेत.
अपघाताची अधिक माहिती अशी, मारुती धरमले याचा विवाह ठरला होता. धरमले कुटुंबीयाकडून लग्नाची तयारी सुरू होती. यासाठी हे सर्व जण जीपमधून सरवडे येथे गेले होते. सायंकाळी ते सर्व जण परतत असताना धरमलेवाडी येथे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि जीप झाडावर आदळली. धडक इतकी जोरदार होती, की ती धडकल्यानंतर जीपने दोन वेळा उलटली. यामुळे सर्व जण जीप मधून बाहेर फेकले गेले. या अपघातात पांडुरंग व मारुती हे पिता-पुत्र जागीच ठार झाले, तर अन्य तिघे रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत झाले. सर्व जखमींना सोळांकुर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नंतर तेथून त्यांना येथील सीपीआरमध्ये दाखल केले.