‘प्रधानमंत्री जन धन’ योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यात आत्तापर्यंत ५ लाख १२ हजार कुटुंबांची बँक खाती उघडण्यात आली असून, हे काम ८७ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित कुटुंबांची बँक खाती महिनाअखेपर्यंत काढण्याची कार्यवाही पूर्ण केली जाईल, असे प्रतिपादन बँक ऑफ इंडिया या अग्रणी बँकेचे अधिकारी एम. डी. कुलकर्णी यांनी येथे केले.
जिल्ह्यातील प्रत्येक कुटुबांचे बँक खाते काढण्याची प्रक्रिया येत्या महिनाअखेपर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील बँकेने प्रयत्न सुरू ठेवले असल्याचे सांगून एम. डी. कुलकर्णी म्हणाले, सांगली जिल्ह्यात ५ लाख ९५ हजार कुटुंबे असून यामध्ये ४ लाख ३३ हजार ग्रामीण भागातील कुटुंबे असून १ लाख ६२ हजार शहरी भागातील कुटुंबांचा समावेश आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील ५ लाख ९५ हजार कुटुंबांपकी ५ लाख १२ हजार कुटुंबांची बँक खाती काढण्यात आली असून यामध्ये ३ लाख ८२ हजार खाती ग्रामीण भागातील आहेत. तर १ लाख ३० हजार खाती शहरी भागातील आहेत. जिल्ह्यातील कुटुंब संख्येच्या तुलनेत ८७ टक्के बँक खाती काढण्याचे प्रमाण असल्याचे ते म्हणाले.
प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत शून्य बॅलन्सवर बँक खाते काढले जात असून १ लाखाच्या अपघाती विम्याचे या योजनेत संरक्षण दिले असून, त्याचा कसलाही प्रीमियम खातेदारास भरावा लागणार नसल्याचे सांगून एम.डी. कुलकर्णी म्हणाले, खातेदारास बँक पुस्तकाबरोबरच रूपे डेबिट कार्डही खातेदारास दिले जात आहे. मात्र हे कार्ड ४५ दिवसांतून विमा संरक्षण मिळण्याकरिता एकदा आíथक अथवा गरआíथक कामासाठी वापरणे गरजेचे आहे. तसेच व्यवस्थित खाते व्यवहार करणाऱ्या खातेदारांना कमीतकमी १ हजार ते जास्तीतजास्त ५ हजारापर्यंतच्या ओव्हरड्राफ्ट कर्जसुविधेचा अंतर्भाव आहे. सदर उघडलेली बँक खाती ही शासनाच्या विविध अनुदान योजनांसही साहाय्यभूत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 प्रधानमंत्री जन धन योजना ही सर्वसामान्य माणसासाठी अतिशय उपयुक्त योजना असल्याचे सांगून एम. डी. कुलकर्णी म्हणाले, या योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला बँक खात्याने जोडण्याचा संकल्प असून हे बँक खाते नागरिकाच्या घरी जाऊन बँक प्रतिनिधीमार्फत तसेच विविध ठिकाणी शिबिरे घेऊनही बँक खाती उघडली जात आहेत. या योजनेमुळे सर्वसामान्य लोकांना बँक खाते तर मिळतच आहे, शिवाय त्यांना सन्मान देऊन त्यांना बँकिंग क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
देशात प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत आत्तापर्यंत ८ कोटी ६३ लाख लोकांची बँक खाती उघडण्यात आली आहेत. सांगली जिल्ह्यात या योजनेस जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी गती दिली असून, त्यांनी या योजनेच्या यशस्वीतेसाठी वेळोवेळी बठका घेऊन योग्य मार्गदर्शन तसेच संबंधित यंत्रणांना निर्देशही दिल्याने या योजनेला जिल्ह्याच्या ग्रामीण तसेच शहरी भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचेही एम. डी. कुलकर्णी म्हणाले.