बँकेसमोर लावलेल्या मोटारीच्या दरवाजाची बंद असलेली काच तोडून अज्ञात चोरटय़ांनी मोटारीतील भरदुपारी पाच लाख रुपयांची रोख रक्कम चोरून पोबारा केला. ही घटना आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शहराजवळील साकुरी शिवारातील बँक ऑफ बडोदा समोर घडली.
फिर्यादी प्रशांत बापूसाहेब डांगे (वय २८ रा.दहेगाव) यांनी शहरातील युनियन बँकेतून सोयाबीन विक्रीचे आलेले २ लाख व दुस-या खात्यावरून ३ लाख अशी ५ लाखांची रक्कम त्यांची फोक्सवॅगन मोटारीच्या  (क्र.एम.एच १७ ए.आर ०१०१) डिक्कीत ठेवून ते मोटार घेऊन शहराजवळील साकुरी शिवारात असलेल्या बँक ऑफ बडोदा समोर मोटार उभी करून या बँकेत काही कामानिमित्त गेले असता अज्ञात चोरटय़ांनी या संधीचा फायदा घेत मोटारीची बंद दरवाजाची काच तोडून मोटारीच्या डिक्कीतील रोख ५ लाखांची रक्कम लंपास केली. भरदुपारी घडलेल्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. प्रशांत डांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी अज्ञात चोरटय़ांच्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.