रत्नागिरी जिल्ह्य़ात ८ नवे करोनाबाधित रुग्ण;  बाधितांची एकूण संख्या १८३

जिल्हा रुग्णालयातील करोनाची बाधा झालेल्या ९ परिचारिकांपैकी ५ जणी करोनामुक्त झाल्यामुळे रूग्णालय कर्मचाऱ्यांनी त्यांना शुभेच्छांसह निरोप दिला.

या परिचारिकांपैकी काहीजणी शहरात सर्वेक्षणासाठी गेल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांनी एका परिचारिकेला करोनाची लक्षणे दिसून आली. एकाच निवासी क्षेत्रात राहत असल्याने त्यापाठोपाठ आणखी आठजणी करोनाबाधित होऊ न रूग्णालयात दाखल झाल्या. या सर्वजणींची लक्षणे सौम्य स्वरूपाची होती. तरीसुद्धा दोघीजणींचे चाचणी अहवाल दोनदा पॉझिटीव्ह आल्यामुळे काहीसे चिंतेचे वातावरण होते. पण या संकटाचा यशस्वी मुकाबला करून पाचजणी बुधवारी रोगमुक्त झाल्या. इतर चौघींची प्रकृतीही सुधारत आहे.

अशा प्रकारे करोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे आरोग्य विभागालाही दिलासा मिळत आहे.

दरम्यान मंगळवारी रात्रीपर्यंत जिल्ह्य़ात आणखी ८ करोनाबाधित रुग्ण आढळले असून बाधितांची एकूण संख्या १८३ झाली आहे. त्यात रत्नागिरी तालुक्यातील ६,  तर संगमेश्वरातील दोघांचा समावेश आहे.

जिल्ह्य़ात आढळून येत असलेल्या करोनाबाधित रुग्णांपैैकी ९५ टक्के रुग्ण मुंबई, ठाणे या रेड झोनमधील आहेत. सध्या जिल्ह्य़ात दाखल झालेल्या चाकरमान्यांची संख्या पाऊ ण लाखावर पोचली आहे. मंगळवारी सायंकाळी १४ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार रत्नागिरीतील ६ आणि संगमेश्वरातील २ अशा आठ जणांना करोना झाल्याचे निष्पन्न झाले होते.

यामध्ये पुनस कुंभारवाडीतील तरुण चेंबूर मुंबईतून २१ मे रोजी गावी आला होता. त्याचे २४ मेला स्वॅब पाठविण्यात आले. ते पॉझिटिव्ह आले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. कांदिवली मुंबईतून राजापूरला आलेल्या तरुण मुलीचे आई-वडील आणि भाऊ  पॉझिटिव्ह आहेत. त्यांच्या संपर्कात आल्यामुळे ती बाधित झाली आहे.

नाणीज घडशीवाडी येथील पती-पत्नी मालाडहून २३ मेला गावी आले होते. ते संस्थात्मक विलगीकरणात होते. त्यांना ताप आणि अंगदुखी जाणवत असल्यामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संगमेश्वर दख्खन येथील तरुण मुलुंड, मुंबईतून १९ मेला आला होता. तसेच शांतीनगर येथे मुंबईतून आलेला मुलगा संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. संगमेश्वर तालुक्यातील दोन रुग्ण हे मुंबई विरार येथून प्रवास करत आले होते. त्यांना उपचारासाठी संगमेश्वर येथे दाखल केले होते. त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्ह्य़ात तपासणीसाठीचे नमुने ५ हजार ५२१ असून पॉझिटिव्ह अहवाल १८३ आहेत. त्यातील ६९ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. उपचाराखालील रुग्णांची संख्या १०९ इतकी आहे. रेडझोनमधून आलेल्यांची संख्या वाढली असून त्यातील कंटेनमेंट झोनमधील लोकांचे स्वाब तपासणीसाठी घेतले जात आहेत. त्यामुळे प्रलंबित नमुन्यांची संख्या ४ हजार ६०२ इतकी झाली आहे. जिल्ह्य़ात गृह विलगीकरणाखाली असलेले ८५ हजार ४२३, तर संस्थात्मक विलगीकरणाखाली २०० जण आहेत.