कोल्हापूर शहर प्लास्टिक मुक्त करण्याचे कार्यवाही झपाट्याने सुरू असताना शुक्रवारी झोमॅटो आणि स्विगी या ऑनलाइन अन्न पुरवठा करणाऱ्या कंपनीला प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याने पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला. झोमॅटो व स्विगी या अन्नपुरवठा करणाऱ्या कंपन्यांमधून प्लास्टिक पिशवीचा वापर केला जातो, अशी तक्रार महापालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे आली होती. आयुक्तांनी महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांना संबंधितांवर कारवाई करण्याची सूचना केली होती.

डॉ. पाटील यांनी प्लास्टिक प्रतिबंधात्मक पथकाला ऑनलाइन अन्नाची ऑर्डर देण्यास सांगितले होते. त्यानुसार या दोन्ही कंपन्यांचे कर्मचारी महापालिकेमध्ये ऑर्डर घेऊन आले. त्याची तपासणी केली असता अन्न प्लास्टिक पिशवीमधून आणले असल्याचे निदर्शनास आले. प्लास्टिक बंदी अधिनियमानुसार झोमॅटो व स्विगी कंपनीच्या प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची पावती देण्यात आली. तसेच जेवणाची ऑर्डर दिलेल्या कोल्हापूर डायनिंग हॉटेललाही पाच हजार रुपये दंड करण्यात आला आहे.

स्विगी कंपनीला ‘नॉन ओव्हन प्लास्टिक’ पिशवीचा तर झोमॅटोला ‘प्लास्टिक कॅरीबॅग’ चा वापर केल्याबद्दल दंड केल्याचे डॉक्टर पाटील यांनी सांगितले. ही कारवाई विभागीय आरोग्य निरीक्षक निखिल पाडळकर, आरोग्य निरीक्षक सुशांत शेवाळे,सुशांत गावडे,मनोज लोट व श्रीराज होळकर यांनी केली.