त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथे पाच वर्षाच्या चिमुरडीवर १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नराधम मुलाला अटक केली असून घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी काही काळ मुंबई – नाशिक महामार्ग अडवून धरला. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी शांततेचे आवाहन केले आहे.

तळेगावमध्ये १५ वर्षाच्या मुलाने शनिवारी संध्याकाळी गावातील ५ वर्षाच्या मुलीला पेप्सी देण्याच्या बहाण्याने बाहेर नेले. यानंतर त्याने मुलीला गावातील एका निर्जन कार्यालयामध्ये नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार समोर येताच ग्रामस्थ आक्रमक झाले. सुमारे ३०० जणांचा जमाव त्र्यंबक पोलिस ठाण्यात धडकला. आरोपीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी या जमावाने केली. पोलिसांनीही तात्काळ नराधम अल्पवयीन आरोपीला अटक केली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आला. जमावाने शनिवारी रात्री अंजनेरी फाट्यासह वाडीवऱ्हे आणि घोटी येथे रास्ता रोको केला. रविवारी सकाळीही या घटनेचे पडसाद दिसून आले. ग्रामस्थांनी मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको केला.  जमावाने पोलिसांच्या तीन गाड्यादेखील जाळल्या आहेत.

घटनेतील पीडित मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. ग्रामस्थांनी नराधम आरोपीच्या घराला पेटवण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. मात्र पोलिसांकडून या वृत्ताला दुजोरा मिळू शकलेला नाही. याप्रकरणी आरोपीवर बलात्कार आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून नागरिकांनी शांतता राखावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न -गिरीश महाजन

पालकमंत्री गिरीश महाजन यांनीदेखील त्र्यंबकेश्वरमध्ये भेट देत आढावा घेतला. पीडित मुलीवर बलात्कार झाला नसल्याचे वैद्यकीय अहवालातूस समोर आले आहे. पीडितेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाला असे त्यांनी सांगितले. ही घटना दुर्दैवी असून आरोपीला कठोर शिक्षा होईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे.