ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्रातील शिवणी वनक्षेत्रातील विहिरीत पडून पाच वर्षांच्या पट्टेदार वाघिणीचा मृत्यू झाल्यामुळे वनखात्यात खळबळ उडाली आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये सिंदेवाहीजवळच शिवणीच्या जंगलात नामदेव गहाणे यांच्या शेतातील विहिरीत मंगळवारी सकाळी वाघिणीचा मृतदेह तरंगताना आढळून आल्यानंतर वन अधिकाऱ्यांना त्याची माहिती कळविण्यात आली. वाघिणीला दोराने बांधून विहिरीबाहेर काढून पंचनामा करण्यात आला. वाघिणीच्या शरीरावर कुठलीही इजा किंवा शिकारीच्या दृष्टीने विषप्रयोग किंवा अन्य बाबी आढळल्या नाहीत, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रविकांत खोब्रागडे यांनी दिली. दरम्यान, वाघिणीच्या मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी आवश्यक भाग हैदराबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.
वाघिणीच्या मृत्यूच्या पाश्र्वभूमीवर शेतातील खुल्या विहिरींना लोखंडी कठडे व संरक्षण भिंत तयार करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, वाघिणीच्या मृत्यूने वन्यजीवप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
वाघिणीच्या पिल्लाचा शोध
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १५ दिवसांपासून एक पट्टेदार वाघीण तिच्या पिल्लासह या परिसरात फिरताना अनेकांना दिसली. विहिरीत मृत्युमुखी पडलेली वाघीण तीच असेल तर सोबतचे पिल्लू गेले कुठे, असाही प्रश्न पडला आहे. त्यामुळे वनखात्यानेही विहीर व  जंगल परिसरात वाघिणीच्या पिल्लासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.