गारपीट व अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर आलेले हे संकट मोठे आहे. त्याला सामोरे जाण्याची मानसिकता करण्यासाठी सरकार अआधिकाधीक नुकसान भरपाई देईल असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आचारसंहितेमुळे याबाबत अधिक भाष्य करण्याचे टाळले.
पलार यांनी सोमवारी कर्जत तालुक्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. आमदार बबनराव पाचपुते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनशाम शेलार, राजेंद्र फाळके, संभाजीराजे भोसले, सभापती सोनाली बोराटे, काकासाहेब तापकीर, राजेंद्र गुंड आदी यावेळी उपस्थित होते.
गारपीटीचा सर्वाधिक तडाखा कर्जत तालुक्यास बसला आहे. तालुक्यातील १९ गावांमधील सुमारे साडेपाच हजार हेक्टरला या सुलतानी संकटाची झळ बसली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचे किमान ५० कोटींचे नुकसान झाले आहे. तालुक्यात सलग तीन दिवस गारपीट झाली. रविवारी तालुक्यात सर्वत्र जोरदार पाउस पडला. त्यानेही शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले आहेत. तालुक्यातील बारडगांव दगडी, पिंपळवाडी, कोपडी, कुळधरण, रूईगहण, नांदगाव, चखालेवाडी, टाकळी, चिंचोली, पाटेगाव, पाटेवाडी या गावांमधील डाळिंब, आंबा, पपई, कलिंगड, ज्वारी, गहू, कांदा, हरबरा व ऊस या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
कोरडी सहानुभूती नको!
यावेळी अनेक शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. अनेक नेत्यांनी येऊन पाहणी केली व सहानभूती दाखवली. मात्र नुकसानीबद्दल कोणीही ठोस बोलत नाही. नियमांचे फार अवडंबर करू नये, शेतकऱ्यांचा अंत पाहू नये अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.