सोलापूर शहरालगतच्या बोरामणी विमानतळासाठी ३४ हेक्टर खासगी जमिनीच्या संपादनासाठी ५० कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करत विमानतळासाठी आवश्यक असणाऱ्या वन विभागाची ३२ हेक्टर जमीन संपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिले.

बोरामणी विमानतळाच्या प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक पार पडली.  सोलापूर शहरात होटगी येथे सद्य:स्थितीत विमानतळ आहे. मात्र या विमानतळाचा वापर सध्या अनुसूची नसलेली विमान उड्डाणे (नॉन शेडय़ुल फ्लाइट) करण्यात येत आहे. परंतु हे विमानतळ छोटे असल्यामुळे ‘ए-३२०‘ व त्या प्रकारच्या विमानांसाठी उपयुक्त नाही. तसेच हे विमानतळ शहरात असल्याने विमानतळानजीक असलेले साखर कारखाने व नागरी वस्तीमुळे या विमानतळाचा विस्तार करणे शक्य नाही.

त्यामुळे सोलापूर शहरापासून सुमारे १३ किलोमीटर अंतरावर सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गालगत बोरामणी व तांदूळवाडी येथे नवीन ग्रीन फील्ड विमानतळ विकसित करण्यात येत आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी सहभाग तत्त्वावर उभारण्यात येणार आहे. त्यानुसार महाराष्ट्र विमान विकास कंपनीने बोरामणी-तांदूळवाडी या ठिकाणी सुमारे ५४९ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण केले आहे. उर्वरित सुमारे ३४ हेक्टर खासगी जमिनीच्या भूसंपादनासाठी निधीची आवश्यकता होती.