उड्डाण पुलावरील अपघातात दोन ठार
फटाक्यांची जोरदार आतषबाजी आणि ‘लेझर शो’द्वारे शुक्रवारी सायंकाळी दिमाखदारपणे खुला करण्यात आलेला शहरातील महाकाय उड्डाण पूल दुचाकींच्या अपघातामुळे अवघ्या काही तासांतच बंद करण्याची नामुष्की ओढावली. अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. या पाश्र्वभूमीवर वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या उपाययोजना करण्याची तयारी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने दर्शविल्यानंतर १४ तासांनंतर म्हणजे शनिवारी दुपारी हा उड्डाण पूल वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला.
पोलीस यंत्रणेच्या सूचनेनुसार उड्डाण पुलावरून मार्गस्थ होताना वाहनधारकांना प्रतिताशी ५० किलोमीटरची वेगमर्यादा पाळावी लागणार आहे. आधी ही वेगमर्यादा ताशी १०० किलोमीटर होती. ती निम्म्याने कमी करण्यात आली आहे.
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अत्याधुनिक तंत्राच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या ६.१ किलोमीटर लांबीच्या उड्डाण पुलाचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी सायंकाळी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यानंतर रात्री नऊच्या सुमारास फटाक्यांची जोरदार आतषबाजी व ‘लेझर शो’चेही आयोजन करण्यात आले होते. उड्डाण पूल सुरू झाल्यामुळे अनेक वाहनधारक रपेट मारण्यास उत्सुक होते. या पुलावर दुचाकी व तीनचाकी वाहनांना प्रतिबंध करण्यात आला आहे. पण, त्याकडे दुर्लक्ष करत निघालेल्या दोन दुचाकींमध्ये धडक होऊन हर्षल धटिंगण व खुलसिंग पवार या दोघांचा मृत्यू झाला, तर रोहन पगारे, मनोज साळी हे जखमी झाले. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला. पुलावर प्रतिबंध असूनही भ्रमंती करणाऱ्या दुचाकी व तीनचाकी वाहनधारकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.

* अधिकाऱ्यांची तातडीची बैठक
 पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण यांच्या अधिकाऱ्यांची शनिवारी सकाळी तातडीची बैठक झाली. उड्डाण पुलाच्या रचनेवरून आधी ताशी १०० किलोमीटर इतकी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली होती. ही वेगमर्यादा निम्म्याने कमी केली जात असल्याचे पोलीस यंत्रणेने सूचित केले. वाहतूक सुरक्षिततेसाठी पुलावर धोकादायक ठिकाणी ‘रिफ्लेक्टर’ व सूचना फलकांची संख्या वाढविण्याची तयारी राष्ट्रीय महामार्ग विभागाने दर्शविली आहे. या बैठकीनंतर शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास उड्डाण पूल वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला.