पावसाअभावी राज्यातील अनेक भागांत दुष्काळाचे सावट गडद आहे. धरणांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्येही सुमारे ३०० गाव-पाडय़ांची तहान टँकरने भागवावी लागत आहे. असे असताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि त्यांच्या कुटुंबीयांना गोदावरीच्या वाहत्या पाण्यात ‘मार्जन स्नान’ घडावे याकरिता गंगापूर धरणातून ५० दशलक्ष घनफूट पाणी सोडले गेले. एकलहरे औष्णिक वीज केंद्रासाठी ते सोडल्याचा खुलासा पाटबंधारे विभागाचे अधिकारी करीत असले, तरी शहा कुटुंबीयांचे नाशिकमधील आगमन आणि वीज केंद्राला लागलेली पाण्याची तहान या योगायोगाबद्दल मात्र दबक्या सुरात चर्चा सुरू आहे.
वैष्णव पंथीय आखाडय़ांच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी भाजप अध्यक्ष शहा यांचे कुटुंबासह मंगळवारी सायंकाळी येथे आगमन झाले. या कार्यक्रमासोबत कुंभनगरीत पूजाविधी करण्याचे त्यांचे नियोजन होते. त्यानुसार बुधवारी सकाळी साडेसहा वाजता ते कुटुंबीयांसह रामकुंड तीर्थावर पोहोचले. पोलीस यंत्रणेने आधीच संपूर्ण परिसराचा ताबा घेऊन सर्वसामान्य भाविकांना या तीर्थावर प्रवेश बंद केला. यामुळे भाविकांना रामकुंड सोडून इतरत्र स्नान करण्यासाठी जावे लागले. मंगळवारी रात्रीपर्यंत गोदावरी पात्रात फारसे पाणी नव्हते; पण बुधवारी पहाटे तिच्या पातळीत अचानक वाढ झाल्याचे दिसले. प्रवाही झाल्यामुळे गोदावरीचे सौंदर्य चांगलेच खुलले. गंगा-गोदावरीच्या विधिवत पूजनानंतर शहा कुटुंबीयांनी मार्जन स्नान (अंगावर केवळ पाणी शिंपडणे) केले. पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल व सहकाऱ्यांनी त्याचे पौरोहित्य केले. तासभरानंतर शहा यांच्या वाहनांचा ताफा साधुग्राममधील ध्वजारोहण सोहळ्यासाठी रवाना झाला.
जुलै महिन्यात पुरोहित संघाच्या ध्वजारोहणावेळी गोदावरीचे सौंदर्य खुलविण्यासाठी प्रशासनाने गंगापूर धरणातून ४८ दशलक्ष घनफूट साठय़ावर पाणी सोडले होते. मात्र तेव्हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम गोदाकाठावर होता. बुधवारचे आखाडय़ांचे ध्वजारोहण नदीपासून काही अंतरावर होते. कार्यक्रमस्थळापासून तर गोदावरी दृष्टीसही पडत नाही. असे असतानाही पुन्हा पाणी सोडण्यात आले. वस्तुत: शासनाने कुंभमेळ्यासाठी गंगापूर धरणातील एक हजार दशलक्ष घनफूट पाणी आधीच आरक्षित केले आहे. प्रमुख शाही स्नानांच्या दिवशी प्रशासनाने पाणी सोडून गोदावरी प्रवाही ठेवण्याचे नियोजन केले आहे. मात्र स्नानासाठीच्या विशेष तारखा गेल्या महिनाभरात येऊनही गेल्या, तरी त्या वेळी पाणी सोडण्यात आले नव्हते. सिंहस्थ पर्वाला सुरुवात झाल्यापासून दररोज शेकडो भाविक स्नानासाठी येत आहेत. त्यांना गोदेच्या साठलेल्या पाण्यातच डुबक्या माराव्या लागत आहेत. बुधवारी मात्र सर्वसामान्यांना दुरापास्त असलेले वाहत्या गोदावरीचे दृश्य नेमके दिसल्याने त्याबद्दल येथे चांगलीच चर्चा रंगली.