रत्नागिरी नगर परिषदेच्या चार जागांसाठी रविवारी झालेल्या पोटनिवडणुकीत मतदारांच्या निरुत्साहामुळे जेमतेम सुमारे ५० टक्के मतदान नोंदवण्यात आले. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (२ नोव्हेंबर) होणार आहे. नगर परिषदेच्या दोन प्रभागांतील चार नगरसेवक पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्र ठरल्यामुळे ही निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत झाली. काँग्रेसने निवडणुकीत उमेदवार उभा केला नाही. निवडणुकीतील प्रमुख उमेदवार पुढीलप्रमाणे- प्रभाग २ (ब)- ऋतुजा देसाई (शिवसेना), कौसल्या शेटय़े (राष्ट्रवादी), नीलिमा शेलार (भाजप); प्रभाग २ (ड)- पूर्वा सुर्वे (शिवसेना), शिल्पा सुर्वे (राष्ट्रवादी), सुहासिनी भोळे (भाजप); प्रभाग ४ (अ)- तन्वीर जमादार (शिवसेना), उमेश शेटय़े (राष्ट्रवादी), मनोज पाटणकर (भाजप); प्रभाग ४ (ड)- दिशा साळवी (शिवसेना), रुबिना मालवणकर (राष्ट्रवादी), निशा आलीम (भाजप). या पोटनिवडणुकांच्या मतदानासाठी शहरातील १३ मतदान केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली. दुपारी दीड वाजेपर्यंत एकूण सुमारे ३० टक्के मतदान नोंदवण्यात आले. त्यामुळे दुपारनंतरच्या सत्रामध्ये मतदार बाहेर काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार प्रयत्न करण्यात आले. तरीसुद्धा संध्याकाळ अखेपर्यंत ५० टक्क्यांचाच टप्पा गाठणे शक्य झाले. या पोटनिवडणुकांची मतमोजणी सोमवारी सकाळी होणार आहे. अर्थात या चार जागांसाठी रविवारी मतदान झाले असले तरी संपूर्ण निवडणूक शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये गेलेले माजी नगराध्यक्ष उमेश शेटय़े यांच्याभोवती केंद्रित झाली होती. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीने जिंकलेल्या या चार जागा खेचून घेण्यासाठी शिवसेनेतर्फे आमदार उदय सामंत आणि राजन साळवी यांनी ताकद लावली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या जागा कायम राखण्याचे आव्हान शेटय़े यांच्यासमोर असून त्यातील यशापयशावर त्यांचे राजकीय भवितव्य ठरणार असल्यामुळे पोटनिवडणुका असूनही शहर पातळीवरील सेना आणि राष्ट्रवादीमधील संघर्ष या निवडणुकांच्या निमित्ताने चव्हाटय़ावर आला. तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री भास्कर जाधव, शिवसेनेचे पालकमंत्री रवींद्र वायकर इत्यादींनी प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात भाग घेत चौफेर टोलबाजी केली. संपूर्ण प्रचारात विकासाचे मुद्दे बाजूला राहून व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपांनीच निवडणूक रंगली. शेटय़े यांनी कौसल्या शेटय़े या सूनबाईंनाही निवडणुकीत उभे केले असल्यामुळे त्यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे. भाजपचा एकही उमेदवार निवडून येण्याची शक्यता नसली तरी शिवसेनेच्या यशाच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचे काम या पक्षाच्या उमेदवारांनी केले आहे.