स्वच्छता, आरोग्य आणि विकासासाठी सरकार व खाजगी कंपन्याच्या संयुक्त भागीदारीने देशातील ५०० शहरे विकसित करण्याची केंद्राची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्था आणि पाण्याचा पुनर्वापर ही मोहीम देशभरात राबविण्यात यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
उपराजधानीत होणाऱ्या बहुप्रतीक्षित आणि ऐतिहासिक अशा मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि पूर्व नागपुरातील पारडी भागात होणाऱ्या वैशिष्टय़पूर्ण अशा पुलाचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित करण्यात आले.  कस्तुरचंद पार्कवर झालेल्या या कार्यक्रमाला राज्यपाल के. शंकरनारायण, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, ग्रामीण विकास मंत्री व्यंकय्या नायडू, ऊर्जामंत्री पीयूष गोयल, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, महापौर अनिल सोले आदी मान्यवर उपस्थित होते.
शहराचा विकास कुठल्या दिशेने घेऊन जात आहे, याचा विचार करण्याची गरज आहे. २०१९ मध्ये महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी केली जाणार असून त्यांना स्वच्छता प्रिय होती. त्यांच्या प्रेरणेतून देशभरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी देशभरातील मेट्रो शहरांसोबत ५०० शहरांचा  विकास करण्याच्या दृष्टीने विविध योजना राबविण्याची संकल्पना आहे. सिंगापूर किंवा दुबईतील स्वच्छतेचे आपण कौतुक करतो. मात्र, आपले शहर, गाव आणि देश स्वच्छ राहिला पाहिजे, याचा विचार आपण करीत नाही. आपलीही देशाप्रती काही जबाबदारी असल्याचे मोदी म्हणाले.