रवींद्र जुनारकर

करोना संकटकाळातील ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय दूरवरच्या खेडय़ांत मोबाइल आणि इंटरनेटअभावी निरुपयोगी ठरत असल्याने चंद्रपूरसारख्या जिल्ह्य़ाने त्यावर उपाय शोधून काढत ज्ञानदानाचा नवा आदर्श समोर ठेवला आहे. ‘शाळा बंद शिक्षण सुरू’ या जिल्हा परिषदेच्या उपक्रमाअंतर्गत ५०० हून अधिक शाळा सुरू झाल्या असून करोनाकाळात एकाच वेळी इतक्या शाळा सुरू असणारा राज्यातील हा एकमेव जिल्हा आहे.

जिल्हयातील दूरवरच्या गावात विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचे असेल तर प्रत्यक्ष वर्ग भरवल्याशिवाय पर्याय नाही, ही बाब लक्षात घेऊन चंद्रपूर जिल्ह्य़ाच्या शिक्षण विभागाने जिल्ह्य़ाभरातील मोकळया जागेत, झाडाखाली जागा मिळेल तिथे वर्ग सुरू केले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेत सुरू झालेल्या या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत असून पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत.

करोना महासाथीमुळे राज्यात सर्वत्र शाळा, महाविद्यालये बंद आहेत. शहरांतील काही शाळा तथा महाविद्यालयात ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मात्र जिल्हा परिषद व नगर पालिका तथा महापालिकेच्या गरीब विद्यार्थ्यांकडे महागडे मोबाईल नसल्याने तिथे ऑनलाइन शिक्षणही बंद आहे. आधी चंद्रपूर महापालिकेने पुढाकार घेऊन ‘शाळा बंद शिक्षण सुरू’ हा घरोघरी शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबवला. त्यानंतर चंद्रपूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनीही  हा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली.

 हे सारे कसे होते?

चंद्रपूर जिल्हय़ात खासगी व जिल्हा परिषद मिळून एकूण २,५०७ शाळा आहेत. त्यात जि.प.च्या १,५६१ शाळा आहेत. यातील जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळा या ग्रामीण भागात आहेत. त्यातील ५०० पेक्षा अधिक शाळांमध्ये आज वर्ग सुरू आहेत. या सर्व  शाळा गावातील मोकळय़ा मैदानात, शाळेत किंवा एखाद्या मोठय़ा झाडाखाली सुरू आहेत. प्रत्येक शाळेत विद्यार्थी संख्येनुसार आठ ते दहा विद्यार्थ्यांचे गट तयार करण्यात आले आहेत. या दहा विद्यार्थ्यांचा गट गावात वेगवेगळय़ा ठिकाणी शिक्षणाचे धडे घेण्यासाठी एकत्र येतो. तिथे एका विद्यार्थ्यांची प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. हा विद्यार्थी सर्वाना एकत्र आणतो, त्यानंतर शिक्षक या विद्यार्थ्यांचे वर्ग घेतात, असे शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनी सांगितले.

महत्त्व का? राज्यात शाळा व महाविद्यालय कधी सुरू होणार याची निश्चित तारीख अजूनही जाहीर झाली नाही. असेअसताना चंद्रपूर जिल्हय़ात शाळा आजही अविरत सुरू आहेत. विशेष म्हणजे, शारीरिक अंतर ठेवून शाळांचे वर्ग भरवले जातात. प्रत्येकाला स्थानिक पातळीवर मुखपट्टी, सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात येते. गावातील लोकांनीही यासाठी सकारात्मक पुढाकार घेतला असून विद्यार्थ्यांनीही याला प्रतिसाद दिला.