पालघर : पालघर जिल्हा पोलीस दलातील ५४९ पोलिसांना करोना आजाराची बाधा झाली होती. त्यापैकी ५०९ पोलीस कर्मचारी करोनातून मुक्त झाले आहेत. तर ३६ कर्मचारी उपचाराधीन आहेत. उपचार घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयक दैनंदिन पाठपुरावा पोलीस अधीक्षक यांच्याकडून करण्यात येत आहे.

पालघर पोलीस दलातील ५४९ कर्मचाऱ्यांना बाधा झाली आहे. त्यापैकी ९२ टक्के कर्मचारी उपचारानंतर बरे झाले आहेत. या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेअंतर्गत लाभ मिळाला आहे. उपचारादरम्यान त्यांना कोणताही खर्च करावा लागला नाही. सध्या उपचार घेत असलेल्या ३६ पोलीस कर्मचाऱ्यांपैकी १२ पोलिसांमध्ये करोना आजाराची लक्षणे नसून इतर २४ पोलिसांना आजाराची लक्षणे  असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली. उपचार घेत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन स्थितीचा आढावा पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे स्वत: घेत आहेत.  आवश्यकतेनुसार या कर्मचाऱ्यांना पोलीस कुटुंब आरोग्य योजनेअंतर्गत असलेल्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजना करोनाकाळात पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली आहे. त्याअंतर्गत सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार विनामूल्य होत असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. त्यामुळे ओळखपत्र दाखवल्यानंतर कोणत्याही पोलीस कर्मचारी या योजनेअंतर्गत असलेल्या रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती त्यांनी दिली.

४५ कर्मचाऱ्यांना विनावेतन रजा

पालघर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आजारी असल्याचे कारण सांगून थेट रजेवर निघून गेलेल्या सुमारे ४५ पोलीस कर्मचाऱ्यांची विनावेतन रजा ठरविण्यात आली आहे. करोनाकाळात पोलीस कर्मचाऱ्यांची कमी भासत असताना काही पोलीस कर्मचारी आजारपणाचे कारण सांगून रजेवर गेल्याचे दिसून आले आहे.