गेल्या वर्षीच्या तुलनेत संख्या निम्म्यावर

नीरज राऊत, लोकसत्ता

पालघर : करोनाकाळात यंदा लांब पल्लय़ाची रेल्वेसेवा अजूनही बंद आहे. उपनगरीय सेवा तीन महिन्याच्या खंडानंतर सुरू झाल्या आहेत. असे असले तरी यंदाच्या वर्षी रेल्वे अपघातात ५१ व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले. गेल्या काही वर्षांंच्या तुलनेत ही संख्या निम्मी आहे.

वैतरणा पुलापासून बोर्डी- उंबरगाव या राज्यातील सीमावर्ती भागातपर्यंत यंदा ५१ मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. या पट्टय़ात ऑगस्टमध्ये एकही व्यक्ती अपघातामध्ये मृत पावली नसली तरी सप्टेंबर महिन्यात नऊ नागरिकांचे प्राण गेले आहेत. लांब पल्ल्यांच्या गाडय़ा सध्या मर्यादित स्वरूपात धावत असल्या तरी मालगाडय़ांचे प्रमाण काही पटीने वाढले आहे. शिवाय उपनगरीय सेवांच्या फेऱ्याही पूर्वीच्या तुलनेत अधिक असल्याने रेल्वे गाडय़ांच्या फेऱ्या सुरू आहेत.पालघर, बोईसर आणि डहाणू या शहरी भागात रेल्वेच्या पूर्वेकडील भागात अनेकदा नागरिक हे रेल्वे रूळ ओलांडत असतात. एकीकडे रेल्वे प्रशासन पादचारी पुलांची उभारणी करत असताना त्याचा वापर होत नसल्याने रेल्वे अपघातांची व मृतांची संख्या लक्षणीय राहिली असल्याने ही चिंतेची बाब ठरत आहे.

रेल्वे अपघात झाल्यानंतर जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र त्या दरम्यान जखमी दगावला तर मृत झालेल्या व्यक्तींना डहाणू कॉटेज हॉस्पिटल, दांडी (बोईसर) प्राथमिक आरोग्य केंद्र, पालघरचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येते. त्यानंतर मृताच्या नातेवाईकाचा संपर्क न झाल्यास अंत्यसंस्कार केले जातात.

पाच किलोमीटरची पायपीट

टाळेबंदीच्या काळात रेल्वे हमाल उपलब्ध नसल्याने मृतदेह संबंधित शासकीय रुग्णालया पर्यंत आणण्याची जबाबदारी रेल्वे पोलीस यांची असून अनेकदा अपघातग्रस्त भागापर्यंत पोलिसांना तीन ते पाच किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागतो असे सांगण्यात आले. मृतदेह ठेवण्यासाठी शवागार उपलब्ध नसून पालघर रेल्वे स्थानकात एक शवपेटी सामाजिक संस्थेने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे मृतांची लवकरात लवकर ओळख पटवून नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यास रेल्वे पोलिस प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. असे असले तरी बेवारस मृतांची संख्या लक्षणीय आहे. २०१८ मध्ये ३२, २०१९ मध्ये ३४ तर विद्यमान वर्षी १५ बेवारस मृतदेह दफन केल्याची माहिती पालघर रेल्वे पोलिसांनी दिली.