सातारा जिल्ह्यात नव्याने करोनाबाधित ५१ रुग्ण निष्पन्न होताना, ही संख्या १,५४३ झाली. तर, करोनाने चौघांचा बळी घेतला असून, करोनाबाधित मृतांची संख्या ६५ वर पोहोचली. उपचाराधीन १६ व्यक्ती बऱ्या होऊन रुग्णालयातून घरी परतल्या आहेत. उपचाराधीन व्यक्तींची संख्या ५२८ आहे. तर, करोना संशयित ५६१ जणांच्या घशाच्या स्रावांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

दरम्यान, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दुकाने व बाजारपेठा खुल्या ठेवण्याचा कालावधी ३ तासाने कमी करून तो सकाळी ९ ते दुपारी २ असा केवळ पाच तास केल्याच्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या निर्णयावर छोटय़ा विक्रेत्यांनी संताप तर, व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत लोकप्रतिनिधींनी आपल्या अंगलट काही येऊ नये आणि जनतेचा रोषही ओढावू नये अशा सावध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

करोनाबळी गेलेल्या चौघांमध्ये कुंभारगाव (ता. पाटण) येथील ४२ वर्षीय रुग्ण, लटकेवाडी (ता. कराड) येथील ५२ वर्षीय रुग्ण पाडेगाव (ता. फलटण) येथील ६२ वर्षीय रुग्ण तसेच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना, लोणंद येथे एकाचा मृत्यू झाला आहे. करोना संशयित म्हणून आजवर १७,१३३  जणांच्या घशाच्या स्रावांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यातील ९९४ जणांच्या करोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. गेल्या पंधरवडय़ात टप्प्याटप्प्याने वाढणारी करोनाबाधितांची संख्या गेल्या ७-८ दिवसांत झेपावल्याने पोलीस व प्रशासनाकडून निर्बंधांची कारवाई कटाक्षाने करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर, आरोग्य यंत्रणा सतर्कतेने काम करीत असल्याचा यंत्रणेचा दावा आहे. तर, वाढती रुग्णसंख्या आणि निर्बंधांची कडक अंमलबजावणी यामुळे समाजमन गंभीर बनले आहे. लोकांमध्ये पुन्हा करोनासंकटाची धास्ती बळावली आहे.